कोविड रुग्णालयातून रुग्णाचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:27+5:302021-06-16T04:17:27+5:30

ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चांदूर बाजार : शहरातील ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णालयातून कोरोना संक्रमित रुग्णाने पलायन केले. या घटनेबाबत ...

Patient escapes from Kovid Hospital | कोविड रुग्णालयातून रुग्णाचे पलायन

कोविड रुग्णालयातून रुग्णाचे पलायन

Next

ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार

चांदूर बाजार : शहरातील ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णालयातून कोरोना संक्रमित रुग्णाने पलायन केले. या घटनेबाबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अनभिज्ञ असल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार एकदा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

तालुक्यातील पिंपळखुटा येथील ६० वर्षीय कोरोना रुग्णाला १३ जून रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे राहण्यास नकार देत सदर रुग्णाने १४ जून रोजी रात्री रुग्णालयात धिंगाणा घातला. यानंतर सदर रुग्ण हा १५ जून रोजी पहाटे ४ वाजता कारण न सांगता रुग्णालयातून बाहेर पडला, अशी माहिती कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी धीरज टिकोडे यांनी दिली. बराच वेळ रुग्ण रुग्णालयात न परतल्यामुळे वैद्यकीय यंत्रणा हादरून गेली होती.

पिंपळखुट्यात आढळला रुग्ण

घटनेची माहिती स्थानिक पोलीस व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली. पोलिसांनी पिंपळखुटा येथील पोलीस पाटलांना सूचना दिली. तो त्याच्या घरीच आढळून आला. पोलीस पाटलांनी त्याची समजूत घालून परत चांदूर बाजार येथील कोविड रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधीक्षक म्हणतात, असे घडलेच नाही

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक संध्या साळकर यांना विचारणा केली असता, सदर घटना घडलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी धीरज टिकोडे यांनी मात्र घटनेला दुजोरा दिला. सायंकाळी ५ वाजता पिंपळखुटा येथील पोलीस पाटील यांनी सदर रुग्णाला परत आणले. तो मनोरुग्ण असल्याची माहितीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Patient escapes from Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.