रुग्ण सलाइनवर, नातेवाईक रस्त्यावर; इर्विन, डफरिनमधील धक्कादायक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:24 AM2023-02-22T11:24:31+5:302023-02-22T11:36:35+5:30
सुरक्षा वाऱ्यावर, जबाबदारी कुणाची?
मनीष तसरे
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयाचा परिसर... रात्रीचे बारा वाजलेले... रुग्णालयाचे मुख्य चेनचे गेट अर्धे लावलेले, शेजारीच सुरक्षारक्षक बसलेले होते. गेटच्या आतमध्ये रात्री ९ नंतर कुठल्याच पुरुषाला प्रवेश नसल्याने आत भर्ती असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरच थांबावे लागते.
आत असलेल्या रुग्णासोबत एका महिलेला थांबण्याची परवानगी आहे. त्यामुळे सोबत असलेले पुरुष मुख्य इमारतीसमोरच असलेल्या टिनाचे शेड असलेल्या खुल्या जागेवर झोपलेले रुग्णांचे नातेवाईक... काही मुख्य द्वाराच्या बाजूला झोपलेले नातेवाईक. बाहेरगावावरून प्रसूतीकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसा आणि रात्रीही थांबण्याच्या जेवणासाठीच्या सुविधा अपुऱ्याच... त्यामुळे नातेवाइकांची गैरसोय होत असल्याचे ‘लाेकमत’ने प्रत्यक्ष जाऊन केलेल्या पाहणीत आढळले. सोबतच पार्किंग परिसरात अनेकजण संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आले. त्याला कुणीही हटकल्याचे दिसून आले नाही.
विसावा शेल्टरची स्थिती
जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय. सर्वच आजारांच्या रुग्णांवर येथे उपचार हाेतात. त्यामुळे सामान्यांसाठी हे रुग्णालय मोठे आधार आहे. मात्र, त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांसाठी मात्र सुविधा अपुरी पडल्याचे दिसून आले.
रुग्णासोबत हवा एकच नातेवाईक!
उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत एक नातेवाईक थांबण्यास परवानगी आहे. रात्रीच्या वेळी एक नातेवाईक रुग्णांसोबत असतो. त्याच्यासोबतच ते रात्री आराम करू शकतात. जास्त नातेवाईक असतील, तर त्यांना बाहेरील निवाऱ्यांमध्ये थांबावे लागते.
विसावा शेल्टरची स्थिती
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळ्याच्या ऑपरेशन थिएटरसमोर रुग्णांच्या नातेवाइकांकरिता दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र, या ठिकाणी नादुरुस्त असलेले बेड ठेवण्यात आल्याने अनेकांना येथे रात्री आराम करण्यास जागा अपुरी असल्याने, अनेक जण वार्डसमोरच झोपत असल्याचे दिसून आले.
मग सीसीटीव्ही कशाला?
रुग्णालय परिसरात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, तरीही परिसरात अनेक वेळा नातेवाइकांच्या मोबाइलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा अनेकांना अनुभव आला आहे.
- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती
काय पाहिले?
१) जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात रुग्णांच्या साेबत असलेल्या पुरुष मंडळींना टिनाच्या शेडमध्येच दुर्गंधीयुक्त असलेल्या जागेतच आपली रात्री काढावी लागते. रात्रीच्या वेळी रुग्णाला अडचण निर्माण झाल्यास पुरुष मंडळी त्या ठिकाणी असतात.
२) जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात लहान मुलांचा थॅलेसेमिया कक्ष आहे. त्या ठिकाणी लहान मुले उपचार घेत आहेत. त्यांच्यासोबत फक्त एकालाच राहण्याची मुभा असल्याने, बाकी लोकांना वार्डसमाेर असलेल्या जागेत आपली रात्री काढावी लागली
रुग्णांसोबत रात्रीच्या वेळी एक जण थांबण्याची परवानगी आहे. मात्र, एकापेक्षा जास्त लोकांना थांबता येणार नाही. रुग्णालयाच्या इमारती जुन्या आहेत. इतर कुठेही जागा नाही, त्यामुळे ते शक्य नाही, नवीन जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांकरिता राहण्याची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे.
- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती