अपस्मारच्या रुग्णांना विश्वास देणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:49 PM2018-12-02T21:49:03+5:302018-12-02T21:49:41+5:30
अपस्मार यालाच फीट किंवा मिरगीचा आजार संबोधले जाते. हा दीर्घकालीन मज्जारज्जूचा आजार असून, भारतात सुमारे ५ दशलक्षाहून अधिक नागरिक याने ग्रस्त आहेत. फीट येणारे व्यक्त हे सामान्य व्यक्तीच असून, त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे.
इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपस्मार यालाच फीट किंवा मिरगीचा आजार संबोधले जाते. हा दीर्घकालीन मज्जारज्जूचा आजार असून, भारतात सुमारे ५ दशलक्षाहून अधिक नागरिक याने ग्रस्त आहेत. फीट येणारे व्यक्त हे सामान्य व्यक्तीच असून, त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे. या आजाराबाबत अनेक गैरसमज असून, ते दूर व्हावे त्यांना जगण्यास आत्मविश्वास मिळावा, हाच यामागील उद्देश आहे, असे दिशा फौंडेशनचे डॉ. श्रीकांत शिंगणे यांनी जागतिक अपस्मारदिनी आयोजित कार्यक्रमात सांगितले.
लाखभर अपस्मार रुग्ण वैद्यकीय उपचारांना दाद देत नसल्याने लँडमार्क एसईएलपी ग्रुप अमरावती, अकोला येथील दिशा फाऊंडेशनच्या सहकार्याने संपूर्ण राज्यभर जनजागृती अभियान राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी जसे बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर १७ नोव्हेंबरपासून जागृती करण्यात येत आहे. अपस्मार या आजाराच्या रुग्णाबाबत भीती नव्हे, तर सहानुभूती आणि कणव बाळगण्याची आवश्यकता आहे.
या करा उपाययोजना
फीट आल्यास तोंडात कांदे, चपला किंवा वस्तू कोंबू नये, श्वास कोंडणार नाही याची काळजी घ्यावी, पोहणे टाळावे, अग्नीजवळ जाण्याचे टाळावे, वाहन चालवू नये, झाडावर चढू नये, भयभीत होऊ नये, ओळखपत्र नेहमी सोबत बाळगावे, अशा स्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांनी न्यूरोलॉजिस्टशी संपर्क साधून उपचार करावे.
आजाराची लक्षणे
झटके, चेहऱ्याला कंप, हात-पाय थरथरणे, लक्ष विचलित होणे, शरीर वेडेवाकोडे होऊन शुद्ध हरपणे आदी अपस्माराची लक्षणे आहेत.
एक ते तीन मिनिटांचा काळ
अपस्मारग्रस्तांना फीट एक ते तीन मिनिटांपर्यंत राहते. त्यादरम्यान तोंडातून फेस येणे, श्वास गुदमरणे, असुरक्षित जागेवर पडल्यास इजा पोहचते. तसेच हा कालावधी वाढल्यास मेंदूला इजा होण्याची शक्यता असते.
औषधोपचार अनिवार्य
अपस्मार हा जिवावर बेतणारा आजार असून, यातून सुटका मिळण्यासाठी रुग्णांना किमान दोन ते पाच वर्षे औषधोपचार घेणे अनिवार्य आहे. तोसुद्धा सुयोग्य पद्धतीने व वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावा. बहुतांश रुग्णांना या अपस्मार आजारातून मुक्तता मिळाल्याची माहिती आहे.