पॅथालॉजी लॅबचालकांकडून रुग्णांची वारेमाप लूट
By admin | Published: March 5, 2016 12:21 AM2016-03-05T00:21:08+5:302016-03-05T00:21:08+5:30
वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांनी जिल्ह्यात थैमान घातले आहे. निरनिराळया वैद्यकीय चाचण्यांच्या नावाखाली बहुतांश पॅथालॉजी लॅबचालकांनी रुग्णांची वारेमाप लूट चालविली आहे.
का नकोत दरफलक ? : नियंत्रण कुणाचे ? लॅबनिहाय बदलतात दर
अमरावती : वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांनी जिल्ह्यात थैमान घातले आहे. निरनिराळया वैद्यकीय चाचण्यांच्या नावाखाली बहुतांश पॅथालॉजी लॅबचालकांनी रुग्णांची वारेमाप लूट चालविली आहे. विविध रुग्णालये, खासगी प्रॅक्टीशनर्सच्या गुंतलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे ‘डीएमएलटी’ पदविका घेऊन अनेकांनी ‘लॅब’ थाटल्या आहेत.
रक्त, लघवी, थायरॉईड या सारख्या तपासण्यांच्या दरात शहरात दुप्पट वाढ झाली आहे. ठरावीक प्रयोगशाळांकडूनच तपासणीचा आग्रह धरला जातो. लॅबनिहाय तपासणीदरामध्ये मोठी तफावत आढळते. शहरात रक्तपूरक घटक तपासणाऱ्या लेबॉरेटरीजची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर नेमके कोणाचे नियंत्रण आहे, याची माहिती लोकांना नाही. या सेवेत व्यावसायिक वृत्ती वाढत आहे. अशा लॅबकडून होणाऱ्या लुटीला आळा घालावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
पॅथालॉजी लॅबमध्ये हवेत दरफलक
शहर तथा जिल्ह्यातील बहुतांश लॅबमध्ये तपासणी शुल्काचे दरफलक दिसत नाहीत, एकाच तपासणीचे विविध लॅबमधील दर वेगवेगळे आहेत. ‘एमडी’ पदविधारक पॅथालॉजीस्ट आणि ‘डीएमएलटी’धारक अशा दोन प्रकारच्या लॅब आहेत. या लॅबमध्ये दरफलक आवश्यक आहेत. महागाई वाढल्याचे कारण सांगून अनेक पॅथालॉजी लॅबचालकांनी तपासणी शुल्कात भरघोस वाढ केली आहे. पॅथॉलॉजी लॅबमध्ये समसमान दर असावेत, अशी रुग्ण व नागरिकांची माफक अपेक्षा असते. मात्र, एकाच चाचणीचे दर लॅबनुसार बदलतात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे रूग्णांची ससेहोेलपट होते. (प्रतिनिधी)
पॅथॉलॉजी लॅबचे अॅक्रिडेशन झाले नसल्याने त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे कारवाई कुणी करावी, हे निश्चित नाही. आणि पॅथॉलॉजी लॅब चालविणाऱ्यांच्या संघटनाही आहेत. लॅबची संख्या सांगता येणार नाही.
- अरुण राऊत,
जिल्हा शल्य चिकित्सक
गुंतागुंतीच्या आजाराचे निदान
वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोगाचे योग्य निदान करणे सुलभ झाले आहे. यात रक्त, लघवी व पूरक घटकांच्या तपासण्यांद्वारे गुंतागुंतीच्या आजाराचे निदान करता येते. शहरात रक्त, लघवी, एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या तपासण्या करणाऱ्या ‘डायग्नोस्टिक सेंटर’ची संख्या वाढत आहे. बहुतेक ठिकाणी तपासणीचे दर मात्र भिन्न आहेत.
डॉक्टरनिहाय बदलतात लॅब !
एकच रुग्ण दोन डॉक्टरकडे गेल्यास दोन दिवस आधी केलेल्या तपासणीचा अहवाल बहुतांश डॉक्टर्स स्वीकारत नाहीत. डॉक्टर्स बदलले की पॅथालॉजी लॅबही बदलते आणि सगळ्या तपासण्या नव्याने कराव्या लागतात. एखाद्या रुग्णाच्या तपासणीचा रिपोर्ट एका लॅबमध्ये निगेटिव्ह येतो, तर त्याच तपासणीचा दुसऱ्या लॅबमधील रिपोर्ट मात्र पॉझिटीव्ह येतो, असे प्रकार वेळोवेळी पाहायला मिळतात.
नाकारले जातात अहवाल
कुठलाही रुग्ण पैसे वाचविण्यासाठी तुलनेत कमी दर असलेल्या शासकीय, सहकारी किंवा एखाद्या ट्रस्टच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या पॅथालॉजी लॅबमधून तपासणी करुन घेतो. मात्र, बहुतांश डॉक्टरांकडून तो नाकारला जातो.