पाटील साहेब, हा घ्या संजय उदापूरकरचा फोटो
By admin | Published: May 23, 2017 12:05 AM2017-05-23T00:05:29+5:302017-05-23T00:05:29+5:30
संजय उदापूरकर हा कसा दिसतो हे तुम्हाला ठाऊक नाही ना? पाटील साहेब तुम्हाला जे जमले नाही ते आम्ही साधले आहे.
अंजनगाव क्रिकेट सट्टा : आता तरी अटक होणार ना ?
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : संजय उदापूरकर हा कसा दिसतो हे तुम्हाला ठाऊक नाही ना? पाटील साहेब तुम्हाला जे जमले नाही ते आम्ही साधले आहे. क्रिकेट सट्ट्याचा मुख्य बुकी कुख्यात संजय उदापूरकरचे हे छायाचित्र बघा आणि करा त्याला अटक!
आयपीएल सट्टा प्रकरणातील मुख्य सूत्रधार परतवाडा येथील संजय उदापूरकर याला ओळखत नसल्याने त्याला अटक करणे कठीण आहे, असे अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुधीर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते. ‘लोकमत’ने शोधमोहीम राबवून संजय उदापूरकरचे अनेक फोटो मिळविले आहेत. अंजनगावचे ठाणेदार सुधीर पाटील यांची अडचण आता नक्कीच दूर होईल आणि ते उदापुरकरच्या मुसक्या आवळतील, अशी खात्री बाळगायला हरकत नसावी. एसपी अभिनाश कुमार यांनाही याप्रकरणाबाबत काहीही विचारले असता, ते ठाणेदारच माहिती देतील, असे सांगत असतात.
सट्ट्यात अनेक प्रतिष्ठितांची नावे
अंजनगाव सुर्जी : आता ठाणेदार एसपींचा विश्वासही सार्थ ठरवतील. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शुक्रवार १२ मे रोजी शहरातील श्रीमंतांची वस्ती असलेल्या सावकारपुरा येथील आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकून तिघांना अटक केली होती. या क्रिकेट सट्ट्याचा मुख्य सूत्रधार परतवाडा येथील संजय उदापुरकर असल्याचे उघड झाले होते. मात्र, संजय उदापुरकर पसार झाल्याने त्याला वेळीच अटक करता आली नाही. तो राजस्थानात असल्याचे त्याचा मोबाईल ट्रेस केल्यावर आढळले होते. पोलिसांनी उदापूरकरला अटक करण्याची कोणतीही विशेष तयारी केली नाही. याबाबत विचारणा केली असता त्याला ओळखत नसल्याचे विचित्र उत्तर मिळाले. क्रिकेट सट्टा प्रकरणात अंजनगाव शहरातील अनेक प्रतिष्ठितांची नावे असल्याने याकडे पोलीस जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा शहरात गल्लोगल्ली सुरू आहे. मात्र, पोलिसांकडून हे प्रकरण विशेष मोठे नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न होत आहे. क्रिकेट सट्ट्यातील मुख्य बुकी संजय उदापूरकर अटकपूर्व जामीन मिळवू शकत असल्याने आम्ही त्याच्याविरूद्ध ठोस पुरावे गोळा करीत असल्याची माहिती ठाणेदारांनी दिली.
कोण आहे संजय उदापूरकर ?
संजय उदापूरकर हा परतवाड्यातील जैन मंदिराजवळ राहतो. त्याच्या घरासमोर छोटा बाजार व वरली-मटका मोठ्या प्रमाणात चालतो. अचलपूर तालुक्यातील सट्टा किंग म्हणून त्याची ओळख आहे. तालुक्यात चालणारा सट्टा हा संजय उदापूरकरच्या माध्यमातून लावला जातो. शहरातील एका गणेशोत्सव मंडळाचा तो अध्यक्ष आहे. गणपती स्थापनेसाठी तो मोठी देणगी देत लाखोंचा खर्च करतो. सुरक्षेसाठी नेहमी दहा-वीस बॉडीगार्ड त्याच्यासोबत असतात. खुल्या जीपमधून फिरत असल्याने त्याची खास ओळख आहे. अचलपूर-चिखलदरा व आसपासच्या तालुक्यात त्याचे ‘टेबल क्लब’ असल्याची माहिती मिळाली आहे.
इसलिए धंदा करता हूं
कुख्यात सट्टा किंग संजय उदापूरकर पोलिसांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरतो. तो नेहमी ‘मैं पुलीस के सामने पैसा फेकता हूं, इसलिये धंदा करता हंू’ असे बोलून, त्याच्याजवळ असलेल्या आर्थिक बळाची गुर्मी दर्शवित असतो.