महिला सरपंचाच्या पतिराजाला आता ग्रामपंचायतीत "नो एन्ट्री" ! "
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:06 AM2021-08-02T04:06:13+5:302021-08-02T04:06:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती जिल्ह्यातील ८४० पैकी ४२१ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती आहे. अर्थात गावपुढारी बनण्याची ही संधी केवळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती
जिल्ह्यातील ८४० पैकी ४२१ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती आहे. अर्थात गावपुढारी बनण्याची ही संधी केवळ ५० टक्के आरक्षणाच्या सक्तीमुळेच मिळाली आहे. या संधीचा फायदा अनेक महिलांनी घेतला आहे. गावाच्या विकासासोबतच आपले नेतृत्वगुण त्यांनी दाखविले आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी पतीच्या इशाऱ्यावरूनच कामकाज चालविले जाते.
काही ग्रामपंचायतींमध्ये तर पती आपली राजकीय वाटचाल कायम ठेवण्यासाठी पत्नीला नामधारी सरपंचपदावर बसवितात. बैठका असो किंवा ग्रामसभा, येथे पती स्वतः उपस्थित राहून निर्देश देतात. शासनादेशाने याला आता चाप बसणार आहे. शासनाला तसे आदेशच काढले आहेत. महिला सरपंचाच्या पतिराजाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. नातेवाइकांकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळून आल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्यविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गावगाड्याच्या कामात नवरोबा, दीर, सासरे, भाऊ, चुलते जवळपास सर्वांच्याच हस्तक्षेपाला चाप बसणार आहे. सक्षम महिला सरपंच असा पायंडा यातून मात्र रचला जाणार आहे.
८४०
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती
४२१
महिला राज असलेल्या ग्रामपंचायत
तालुका महिलाराज असलेल्या ग्रामपंचायती
१) अमरावती ३०
२) दर्यापूर ३८
३) भातकुली २५
४) अंजनगाव सुर्जी २३
५) नांदगाव खंडेश्वर ३३
६) चांदूर रेल्वे २५
७) अचलपूर ३६
८) चांदूर बाजार ३२
९) मोर्शी ३४
१०) धामणगाव रेल्वे ३०
११) तिवसा २३
१२) वरुड ३४
१३) धारणी ३१
१४) चिखलदरा २७
महिला सरपंच म्हणतात....
माझ्या कामात पतीची कधीच लुडबुड होत नाही. सरपंच म्हणून निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून प्राधान्याने निर्णय घेतले जातात. गाव विकासाला आपण प्रथम प्राधान्य देतो. त्यात सहकारी सदस्यांचा सहभाग असतो.
- रोशनी विलास गाडे, सरपंच, सालेपूर (ता. अचलपूर)
--------------
सर्वांना सोबत घेऊन कामकाज सुरू आहे. उपसरपंचासह सर्व सदस्यांना विश्वासात घेतले जाते. पतीसुद्धा सदस्य आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी मार्गदर्शन घेते. त्यांचा प्रत्यक्ष कुठेही कारभारात सहभाग नाही किंवा ते ढवळाढवळ करीत नाही.
- मलाय गणाजी धांडेकर, सरपंच, शहापूर (ता. चिखलदरा)
नवराच कारभारी
गावात महिला सरपंच आहे. परंतु, त्यांच्या पतीची ग्रामपंचायतीमध्ये सतत बैठक असते. गावाच्या विकासकामांसह इतर सर्व निर्णय सरपंचांनीच घ्यायला हवेत.
- अंकुश कथे, सदस्य, सालेपूर ग्रामपंचायत
सरपंचाच्या कारभारात त्यांच्या पतीकडून थेट ढवळाढवळ अजून तरी दिसत नाही. ग्रामपंचायतीच्या विधायक कार्यात आम्ही नेहमीच सहकार्य करतो. पुढेही करीत राहणार आहोत.
- गोपाल खडके, सदस्य, शहापूर ग्रामपंचायत