अमरावती जिल्ह्यातील पोहरा जंगलातील पक्षिवैभवात दुर्मीळ पक्ष्यांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:42 AM2017-12-13T10:42:35+5:302017-12-13T10:45:08+5:30
जंगल व जैवविविधतेने नटलेला समृद्ध असा अमरावती प्रदेश. जिल्ह्यात आकारमानाने मोठा असा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, याशिवाय येथे महेंद्री राखीव जंगल सालबर्डी जंगल, काही गवताळ माळराने व पक्ष्यांची विविधता असलेले अनेक पाणवठे तेथे उपलब्ध आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जंगल व जैवविविधतेने नटलेला समृद्ध असा अमरावती प्रदेश. जिल्ह्यात आकारमानाने मोठा असा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, याशिवाय येथे महेंद्री राखीव जंगल सालबर्डी जंगल, काही गवताळ माळराने व पक्ष्यांची विविधता असलेले अनेक पाणवठे तेथे उपलब्ध आहेत.
याशिवाय अमरावती शहराला लागूनच पोहरा मालखेडचे संपन्न जंगल आहे. मेळघाटात आजवर २९५ प्रजातींच्या पक्ष्याची नोंद झालेली असून जवळपास ३३० प्रजातीच्या पक्ष्यांची पोहरा जंगलात व अमरावती परिसरात आजवर नोंद झालेली आहे. या वैभवात आणखी एका पक्ष्याची भर पडली असून, 'ठिपकेवाली सर्पिका' हा पक्षी नुकताच या जंगलात नव्याने वास्तव्यास आला आहे. शुभम गिरी व प्रतीक खंडारे या पक्षी अभ्यासकांना हा पक्षी पोहरा जंगलात मुक्त विहार करताना आढळून आला. पोहरा जंगलातील ही प्रथमच नोंद आहे.
हा पक्षी मध्यप्रदेशाला लागून असलेल्या विदर्भ, सातपुडा पर्वतरांग, गुजराथ व छत्तीसगडच्या भागात अर्थात फक्त मध्य भारतातच सापडतो. मेळघाट मध्ये या पक्ष्याची यापूर्वीच नोंद झालेली असून मेळघाट बाहेरील जंगलात व जिल्ह्यात ही प्रजाती यापूर्वी आढळून आली नव्हती. मराठीतीत ठिपकेवाली सर्पिका, अशी ओळख असलेल्या या पक्ष्याचे इंग्रजी नाव स्पॉटेड क्रीपर व शास्त्रीय नाव सल्पोनेरीस स्पिलोनोटस असे आहे. याचा आकार अगदी लहान म्हणजेच वटवट्या किंवा शिंजीर पक्ष्याएवढा असून चोच शिंजीरप्रमाणे वाकलेली असते. पंखाच्या काळ्या रंगावर पांढरे ठिपके व पोटाखाली काळे पांढरे ठिपके व डोळ्यावरील काळ्या पट्टीवर लांब पांढरी भुवई असते. झाडाच्या बुंध्यावर व खोडावर फिरून हा पक्षी सालीमधील किडे खात अअसल्याची माहिती पक्षीमित्राने दिली. या नवीन नोंदीमुळे पोहरा मालखेड जंगलाच्या वैभवात अधिकच भर पडल्यामुळे पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.