पवन महाराजला करावे लागणार घर रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:03 PM2018-06-16T22:03:02+5:302018-06-16T22:03:19+5:30
कांतानगरातील शासकीय वसाहतीत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणाऱ्या पवन घोंगडे ऊर्फ घोंगडे महाराज या भोंदूबाबाला घर रिकामे करावे लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधी नोटीस बजावली असून, १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कांतानगरातील शासकीय वसाहतीत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणाऱ्या पवन घोंगडे ऊर्फ घोंगडे महाराज या भोंदूबाबाला घर रिकामे करावे लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधी नोटीस बजावली असून, १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
कांतानगरातील वसाहतीचे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधकाम होत असताना साहित्य ठेवण्यासाठी टिनाच्या खोल्या काढण्यात आल्या होत्या. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या खोल्या तशाच ठेवण्यात आल्या. त्यावेळी शासकीय अधिकाºयांच्या बंगल्यावर काम करणारे पवन घोंगडेचे वडील अनिल घोंगडे याने टिनाच्या एका घरात बस्तान मांडले. अनिल घोंगडे हा शासकीय प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रावर रोजंदारीवर काम करीत होता. तीन वर्षांपूर्वी त्याला कामावरून काढले. तरीसुद्धा शासकीय वसाहतीतील बस्तान त्याने हलविले नाही. यादरम्यान पवन घोंगडेने ‘घोंगडे महाराज’ बनून भोंदूगिरी सुरू केली. देवी अंगात येत असल्याचे सोंग करून नागरिकांच्या भावनांशी खेळ सुरू केला. मात्र, त्याचे कारनामे घराशेजारी राहणाºया नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले होते. त्यामुळे या विज्ञानवादी नागरिकांनी पवन महाराजाचा विरोध केला. तथापि, चेलेचपाट्यांमुळे विरोधाची दखल घेतली जात नव्हती. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव हरीश केदार व गणेश हलकारे यांनी या प्रकरणाची दखल घेतली. पवनमध्ये कधीही अस्तित्वात नसलेल्या तथाकथित चमत्कारी शक्तींचा त्यांनी जाहीर पंचनामा केल्याने पोलिसांनाही या भोंदूगिरीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारावा लागला.
पवन घोंगडेचे पितळ उघड पडल्यानंतर गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला; पवनच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली. आता भोंदूबाबा पवनलाही गजाआड करण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. पवनच्या भोंदूगिरीचे सर्व प्रकार शासकीय वसाहतीत सुरु असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानेही दखल घेतली असून, नोटीस बजावून घर खाली करण्यास सांगण्यात आले आहे.
पवन घोंगडेचे प्रकरण उजेडात आल्याने इतर रहिवाशांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यांनाही नोटीस बजावल्या असून, भोंदूबाबासोबत त्यांनाही बेघर होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पवन महाराजच्या घरातून आणखी दोन तलवारी जप्त
कांतानगरातील शासकीय वसाहतीत वास्तव्य करणाऱ्या भोंदूबाबा पवन घोंगडेच्या घराची गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी पुन्हा झडती घेतली. त्यामध्ये आणखी दोन तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. देवीचा कथित संचार झाल्यानंतर पवन महाराज साडी नेसून व तलवार हाती घेऊन अंधश्रद्धाळूंच्या भावनांशी खेळायचा.
गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी आरोपी पवन महाराजच्या आई-वडिलांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी शुक्रवारीच पवन महाराजच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये तीन तलवारी व तंत्र-मंत्राचे काही साहित्य जप्त केले. त्या तलवारी वैष्णोदेवीवरून आणल्याचे घोंगडे दाम्पत्य सांगत होते. मात्र, दोन तलवारी गंजलेल्या असल्याने या स्थानिक असल्याचा पोलिसांना संशय होता. पवनच्या आईने पोलीस चौकशीत आणखी दोन तलवारी घरी लपून ठेवल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, महिला उपनिरीक्षकांच्या पथकाने शनिवारी घरातून वॉशिंग मशिनमागील दोन तलवारी जप्त केल्या. काही रुद्राक्ष माळांसह अन्य साहित्यदेखील पोलिसांनी जप्त केले.
पाच तलवारी; पोलीस गाफील कसे?
पवन महाराजच्या घरातून पाच तलवारी जप्त करण्यात आल्या. त्याने इतक्या तलवारी घरी ठेवण्याचे कारण काय, तलवारीच्या बळावर दहशत निर्माण करायची होती का, असे प्रश्न निर्माण होत आहेत. पाच तलवारी पवनच्या घरात गेल्यावरही गाडगेनगर पोलिसांचे आजपर्यंत लक्ष गेले नाही. शेकडो नागरिकांसमोर पवन महाराज हातात तलवार घेऊन राहायचा. शेकडो नागरिक हा तमाशा पाहायचे. मग पोलिसांपर्यंत ही वार्ता गेली नाही का, हाही संशोधनाचा विषय आहे.
‘त्या’ आलमारीत दडलय काय?
पवन महाराज भोंदूगिरी करून अंधश्रद्धाळू नागरिकांकडून पैसे उकळायचा. त्याने कमावलेली रोख आलमारीत सुरक्षित ठेवली असावी, याशिवाय तंत्र-मंत्राचे साहित्यसुद्धा आलमारीत असावे, अशी चर्चा होत आहे. त्या आलमारीला पोलिसांनी सील केले. ती उघडण्यासाठी दुसरी चावी बनविली जाणार आहे. दरम्यान, आलमारीची चावी पवनच्या एका महिला भक्ताजवळ ठेवल्याचे घोंगडे दाम्पत्य पोलिसांना सांगत आहे.
टिनाच्या खोल्या तोडणार
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांनी शुक्रवारी सायंकाळी स्वत: शासकीय वसाहतीला भेट दिली. पवन महाराजचे वास्तव्य असलेल्या टिनाच्या खोल्यांची पाहणी केली. त्यावेळी पवनचे वास्तव्य बेकायदेशीर असतानाच, त्याने भोंदूगिरीचा बाजार थाटल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. शासकीय जागेतील टिनाच्या या खोल्या रिकाम्या केल्यानंतर ही जागा मोकळी करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांनी दिली.
शासकीय वसाहतीच्या पाहणीत भोंदूबाबाचे बेकायेदशीर वास्तव्य आढळले. इतर नागरिकांनाही घर खाली करण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. ही कार्यवाही झाल्यानंतर जागा मोकळी करू. त्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला.
- सदानंद शेंडगे,
कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी.