पवन महाराज पसार, आई-वडील अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:16 AM2018-06-15T01:16:41+5:302018-06-15T01:16:41+5:30
अमरावती : अंगात देवी येण्याचे सोंग घेऊन नागरिकांची दिशाभूल करणारा कांतानगरातील पवन महाराज ऊर्फ जय भवानी पसार झाला असून, गाडगेनगर पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांना गुरुवारी अटक केली.
घराची झडती : सीपींच्या आदेशानंतर हलले गाडगेनगर पोलीस, तीन तलवारी जप्त, अंगात देवी येण्याचे नाटकलोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंगात देवी येण्याचे सोंग घेऊन नागरिकांची दिशाभूल करणारा कांतानगरातील पवन महाराज ऊर्फ जय भवानी पसार झाला असून, गाडगेनगर पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांना गुरुवारी अटक केली. साधना अनिल घोंगडे (४०) व अनिल घोंगडे (४५) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी भोंदूबाबा पवन ऊर्फ विशाल याच्या घराची झडती घेऊन काही साहित्य जप्त केले.
कांतानगरातील शासकीय वसाहतीत राहणारे रवींद्र माणिक श्रुंगारे यांच्यासह अन्य काही जणांनी पोलीस आयुक्तांंची भेट घेतली. १५ मे रोजी दिलेल्या तक्रारीवर गाडगेनगर पोलिसांनी कारवाई न केल्याची माहिती दिली. कांतानगरातील अनिल घोंगडे यांचा मुलगा पवन अंगात देवी येण्याचे सोंग करीत भोळ्याभाबड्या नागरिकांना जाळ्यात अडकवून पैसे उकळण्याचा गोरखधंदा करीत आहे. त्याला हटकले असता, तुम्हालाच करणी करेन, अशी धमकी पवन देत होता. अंगात देवी आल्याचे भासवून जोरजोराने अश्लील शिवीगाळ करणे, लिंबू, अंगारा, नारळ व पाणी देऊन नागरिकांना फसविणे, मारुतीच्या मंदिरात नेऊन भूत काढणे असे कृत्य तो करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पवनच्या अशा कृत्याला वडील अनिल व आई साधना साथ देत असून, अशाच कारणावरून तक्रारदार रवींद्र यांच्या वडिलांना पवनने मारहाण करून जखमी केले. या धंद्यात वर्ष झाले, तू माझे काहीही बिघडवू शकत नाही, अशा धमक्या रवींद्र यांना देण्यात आल्या. पवनच्या या कृत्यांची तक्रार अंनिसचे जिल्हा सचिव हरीश केदार यांनी १५ मे रोजी केली. त्यानुसार पोलिसांनी पवन घोंगडेविरुद्ध महाराष्ट्र अनिष्ट रूढी प्रतिबंधक अधिनियम ५, ८ अन्वये गुन्हा नोंदविला. यानंतरही पवनने बुवाबाजी सुरूच ठेवली. अखेर गुरुवारी रवींद्र श्रुंगारे यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे पुन्हा तक्रार केली.
बुवाबाजीचे साहित्य जप्त करण्याचा विसर
घोंगडे महाराज नावाने प्रचलित होत असलेला पवन हा देवी अंगात येत असल्याचा आव आणून नागरिकांमध्ये अंधश्रद्धा पसरवित होता. गुरुवारी गाडगेनगर पोलिसांनी घोंगडे महाराजाच्या घराची झडती घेतली. तेथून तीन तलवारी जप्त केल्या. मात्र, बुवाबाजीसाठी उपयोगी पडणारे अनेक साहित्य जप्त करण्याचा पोलिसांना विसरच पडला होता. त्यांनी जाणूनबुजून ते साहित्य जप्त केले नसल्याचे आढळून आले. हळदीकुंकू लावलेला मोरांच्या पंखाचा गुच्छा, लाल धागे बांधलेले लोलक, तंत्र-मंत्र करण्याचे साहित्य, घोंगडे महाराजाचे छायाचित्र असणारे फलक, घोंगडे महाराजाचे वस्त्र आदी प्रकारचे साहित्य पोलिसांनी जप्त केले नाही.
ठाणेदार मनीष ठाकरेंची सीपींनी केली कानउघाडणी
पवन महाराज ऊर्फ जय भवानीच्या बुवाबाजीची तक्रार घेऊन कांतानगरातील काही नागरिक सर्वप्रथम गाडगेनगर पोलिसांकडे गेले होते. मात्र, पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे नागरिकांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. अंनिसचे जिल्हा सचिव हरीश केदार आणि चमूने पवनच्या घरी जाऊन भोंदूबाबाच्या कारनामे प्रत्यक्ष पाहिले. व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी पवन घोंगडेविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र, त्याचा दरबार सुरूच होता. दुसरी तक्रार सीपींकडे करण्यात आली. ठाणेदार मनीष ठाकरे पवनला पाठीशी घालत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी फोनवरून ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केली.
वडिलांचा आरडाओरडा
घर झडतीदरम्यान पवनचे वडील अनिल पोहोचले. जोरजोरात ओरडून पोलिसांना साहित्य जप्तीसाठी मज्जाव केला. पोलिसांना घरातील वस्तू व साहित्यांना हात लावू दिला नाही. पोलीसही अर्धवट जप्ती करून परतले. त्यावर आक्षेप घेण्यात आल्यावर मनीष ठाकरे पुन्हा जप्तीकार्य पूर्ण करण्यासाठी पोहोचले.