पवन महाराजची ठाण्यात हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:07 PM2018-07-07T22:07:20+5:302018-07-07T22:07:40+5:30
भोंदूबाबा पवन घोंगडे महाराज याने न्यायालयीन आदेशानुसार शनिवारी गाडगेनगर ठाण्यात हजेरी लावली. पण, पवनची वागणूक व मौनधारण पाहून पोलिसांसाठीही तो कुतूहलाचा विषय बनला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भोंदूबाबा पवन घोंगडे महाराज याने न्यायालयीन आदेशानुसार शनिवारी गाडगेनगर ठाण्यात हजेरी लावली. पण, पवनची वागणूक व मौनधारण पाहून पोलिसांसाठीही तो कुतूहलाचा विषय बनला होता.
कांतानगरातील शासकीय वसाहतीत राहणारे रवींद्र श्रृंगांरे यांच्यासह काही नागरिकांनी २१ मार्च रोजी भोंदूगिरी करणाऱ्या पवन घोंगडे महाराजविरुद्ध पहिली तक्रार नोंदविली. त्याच्या घरी चालणाºया बुवाबाजी व तंत्रमंत्राच्या कार्यक्रमांमुळे नागरिक त्रस्त झाल्याचे सादर तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीनंतर नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार नोंदविली. अंनिसचे हरीश केदार यांनी पवन महाराजची भोंदूगिरी पुराव्यानिशी पोलिसांसमक्ष मांडली. त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पवन महाराजविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. १५ जून रोजी कांतानगरातील नागरिकांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे तक्रार सादर केली. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजच्या आई-वडिलांना अटक केली. मात्र, पवन महाराज १५ दिवसांपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पवन महाराजतर्फे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. शनिवार व रविवारी ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने पवन घोंगडेला दिले आहे. ९ जुलै रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आदेशानुसार पवन महाराज शनिवारी गाडगेनगर ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी या प्रकरणाविषयी पवन महाराजची अर्धा तास चौकशी केली.