‘पे अँड पार्क’ची पावती पुस्तके जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:33 PM2018-04-10T23:33:26+5:302018-04-10T23:33:26+5:30

महापालिकेच्यावतीने अचानक सुरू करण्यात आलेल्या ‘पे अँड पार्क’चा मुद्दा आता तापू लागला आहे. राजापेठ ते मालवीय चौकापर्यंत उड्डाणपुलाखाली सुरू झालेल्या ‘पे अँड पार्क’वर मंगळवारी युवा स्वाभिमान संघटनेने हल्लाबोल केला.

'Pay and Park' receipt books were burnt | ‘पे अँड पार्क’ची पावती पुस्तके जाळली

‘पे अँड पार्क’ची पावती पुस्तके जाळली

Next
ठळक मुद्देयुवा स्वाभिमानचे आंदोलन : ‘रेटबोर्ड ’फाडले, पाच कार्यकर्ते ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्यावतीने अचानक सुरू करण्यात आलेल्या ‘पे अँड पार्क’चा मुद्दा आता तापू लागला आहे. राजापेठ ते मालवीय चौकापर्यंत उड्डाणपुलाखाली सुरू झालेल्या ‘पे अँड पार्क’वर मंगळवारी युवा स्वाभिमान संघटनेने हल्लाबोल केला. कंत्राटदारांकडील पावती पुस्तके हिसकून राजकमल चौकात होळी केली. याशिवाय कंत्राटदाराने उड्डाणपुलाखाली विविध ठिकाणी लावलेले दरफलक काढून फाडले.
शहर कोतवाली पोलिसांनी युवा स्वाभिमानच्या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ही योजना बंद करण्याची मागणी त्यांनी केली.
सुरुवातीलाच विरोध
‘पे अँड पार्क’ ही योजना महापालिकेने सर्वसामान्य वाहनचालकांसाठी नव्हे, तर कंत्राटदाराच्या सोईसाठी राबविल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्यासमोरून सुरू झालेल्या उड्डाणपुलाखालून आंदोलनाला सुरुवात केली. त्यांनी ‘वर्कग्रुप’ या कंत्राटदार संस्थेने लावलेली दरफलके फाडली, तर त्यांच्याकडील पावती पुस्तक घेऊन त्या पुस्तकांची राजकमल चौकात होळी करण्यात आली. उड्डाणपुलाखाली सशुल्क वाहनतळ करण्यासंदर्भात बराच खल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने ७ एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी ‘पे अँड पार्क’ सुरू केले. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी तासनिहाय स्वतंत्र शुल्क ठरविण्यात आले. सोबतच मासिक पासची सुविधा देण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवसापासून या प्रयोगाला व्यापाऱ्यांकडून जोरकस विरोध केला जात आहे. मध्यवर्ती बाजारपेठेत ‘पे अँड पार्क’ करू नये, असा पवित्रा अनेकांना घेतला. त्याला अनुसरून बसपचे नगरसेवक ऋषी खत्री व भाजपचे अजय सारस्कर यांनी सोमवारी ‘पे अँड पार्क’ करू नये, यासाठी आयुक्तांना निवेदन दिले. त्यापाठोपाठ मंगळवारी युवा स्वाभिमान संघटनेचे अनूप अग्रवाल, गणेश मारोडकर, नीलेश भेंडे, महेश भारती व मंगेश कोकाटे यांनी ‘पे अँड पार्क’च्या कंत्राटदाराच्या कर्मचाºयाजवळील पावती पुस्तक हिसकावले तथा दरफलकाची नासधूस केली. यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली.
मनसे, बसप, भाजपचाही विरोध
महापालिकेत सत्ताधीश असलेल्या भाजपच्या अंबा मंडळाने ‘पे अँड पार्क’ला जनहितविरोधी संबोधून उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. अंबापेठ प्रभागाचे नगरसेवक अजय सारस्कर यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी हे कंत्राट स्थायी आणि आमसभेच्या मान्यतेविना कसे दिले, असा सवाल आयुक्तांकडे उपस्थित केला. बसपचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य ऋषी खत्री यांनीसुद्धा ‘पे अँड पार्क ’ला जोरदार विरोध दर्शविला आहे. दरम्यान, मनसेही ‘पे अँड पार्क’ला विरोध दर्शविला असून, दोन दिवसांत हे कंत्राट रद्द न केल्यास १३ एप्रिलला मनसे शहर बंद करेल, असा इशारा संतोष बद्रे व अन्य कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Web Title: 'Pay and Park' receipt books were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.