पुनर्निरीक्षण याचिकेचे शुल्क अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:14 PM2019-01-15T22:14:24+5:302019-01-15T22:15:48+5:30
खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध पुनर्निरीक्षण याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नवनीत राणा यांनी आज त्यासाठीचे शुल्क अदा केले. त्यासाठी नवनीत या स्वत: न्यायालयात पोहोचल्या. न्यायालय परिसरात त्यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध पुनर्निरीक्षण याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नवनीत राणा यांनी आज त्यासाठीचे शुल्क अदा केले. त्यासाठी नवनीत या स्वत: न्यायालयात पोहोचल्या. न्यायालय परिसरात त्यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.
नवनीत राणा यांनी दिलेली तक्रार एकतर्फी रद्दबातल केल्यामुळे विस्मरणात गेलेले प्रकरण आता ताजे होणार आहे.
न्यायालयाने नवनीत राणा यांच्या पुनर्निरीक्षण याचिकेसाठीची विलंबमाफी याचिका शुक्रवारी मंजूर केली. नवनीत यांनी १५ दिवसांच्या आत जिल्हा ग्रंथालयाच्या निधीत २ हजार ५०० रुपये जमा करावे, असा आदेश न्यायासनाने दिला होता. त्यानुसार अॅड. परवेज खान यांच्यामार्फत नवनीत राणा यांनी शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तत्पूर्वी, त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली. बुधवारी या प्रकरणाच्या सुनावणीबाबत पुढील तारीख देण्यात येणार असल्याची माहिती नवनीत यांचे वकील अॅड. परवेज खान यांनी दिली. अॅड. दीप मिश्रा, अॅड. शहेजाद शेख, अॅड. रियाज रुलानी, ज्युनिअर अजहर शेख यांनी सहकार्य केले.
विनयभंग प्रकरण रिओपन होणार?
नवनीत राणा यांनी खा. आनंदराव अडसूळ यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. ते प्रकरण पुन्हा न्यायालयासमोर येईल किंवा कसे, ही बाब पुढील न्यायालयीन सुनावणीनंतर स्पष्ट होईल. पुनर्निरीक्षण याचिका स्वीकारण्यासाठीची प्रक्रिया आरंभ झाली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाली की, नियमानुसार याचिका स्वीकारली जाईल, अशी माहिती वकिलांनी दिली.