शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीने शिक्षक बँकेमार्फत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:36+5:302021-06-30T04:09:36+5:30
जिल्हा परिषद; शिक्षक संघटनांची पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडे मागणी अमरावती : शालार्थ प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांचे नियमित वेतन सीएमपी प्रणालीने ...
जिल्हा परिषद; शिक्षक संघटनांची पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडे मागणी
अमरावती : शालार्थ प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांचे नियमित वेतन सीएमपी प्रणालीने राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत अदा करण्याबाबत सुचविले आहे. परंतु, जिल्हयातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे वेतन तथा शिक्षकांचे निवृत्तीवेतन दि अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेमार्फत सन १९९० पासून होत आहे. यानंतरही सीएमपी प्रणालीने शिक्षकांचे वेतन शिक्षक बँकेतूनच करावे, अशी मागणी मंगळवारी विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकारी यांच्याकडे केली.
शिक्षक बँक पगार वितरणापोटी शासनाकडून कुठलाही मोबदला न घेता ९० टक्के शिक्षकांचे वेतन व निवृत्तीवेतन वितरण करते. शिक्षक बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने सॅलरी अर्नर्स बैंक या सदराखाली परवानगी दिली असून, शिक्षकांचे घेतन देण्यासंदर्भात शासनाने ज्या अटी घालून दिलेल्या होत्या, त्यानुसार शिक्षक बॅकेमध्ये सीबीएस प्रणाली अंतर्गत व्यवहार सुरू आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे एटीएम, आरटीजीएस, एनफटी, सीटीएसल क्लिअरिंग, मोबाईल बँकिंग या सेवा पुरवित आहे. इतर राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे सेवा व सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेमार्फतच सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व पदवीधर सभा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक महामंडळ, प्राथमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय रा. उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना ३२, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना आदीनी केली आहे.