परीक्षा संचालकांच्या टेबलवर फेकली शाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 09:39 PM2017-10-05T21:39:39+5:302017-10-05T21:39:53+5:30
संत गाडगेबाबा विद्यापीठात अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आक्षेप नोंदवीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्यावतीने गुरुवारी परीक्षा संचालकांच्या टेबलवर शाई फेकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठात अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आक्षेप नोंदवीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्यावतीने गुरुवारी परीक्षा संचालकांच्या टेबलवर शाई फेकली. निकालातील त्रृट्या दूर झाल्या नाही, तर ९ आॅक्टोबर रोजी पुन्हा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांच्या नेतृत्वात दुपारी अडीच वाजता १० ते १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक जयंत वडते यांच्या दालनात प्रवेश केला. येथील आयबीएसएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील हितेश सानोटकर या विद्यार्थ्याच्या सिव्हिल फोर सेमिस्टर पेपरच्या मुल्यांकनात घोळ असल्याचा आरोप नोंदविण्यात आला. अगोदर सात नंतर १२ पुन्हा आठ गुण कसे? याबाबत परीक्षा संचालकांना विचारणा केली. परीक्षा संचालकांनी पेपरचे मूल्यांकन करणारी यंत्रणा वेगळी असून गुण कसे दिलेत, हे मी सांगू शकत नाही? मात्र याबाबत कुलगुरू मुरलीधर चांदेकर याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी माहिती देत त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. परंतु युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे अनूप अग्रवाल, अभिजित देशमुख, मंगेश कोकाटे, गौतम हिरे, अंकुश ठाकरे आदी समजण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर अभिजित देशमुख, मंगेश कोकाटे यांनी माठात आणलेली शाई टेलबवर फेकून विद्यापीठाच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविला.