बाजार समितीत पार्किगंची शिस्त मोडल्यास ५०० रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:22+5:302021-02-06T04:22:22+5:30
अमरावती : स्थानिक बाजार समितीच्या भाजीपाला, फळ यार्डात गर्दी टाळण्यासाठी व वाहतूककोंडी थांबविण्याच्या उद्देशाने वाहने शिस्तीत लावण्याचे निर्देश ४ ...
अमरावती : स्थानिक बाजार समितीच्या भाजीपाला, फळ यार्डात गर्दी टाळण्यासाठी व वाहतूककोंडी थांबविण्याच्या उद्देशाने वाहने शिस्तीत लावण्याचे निर्देश ४ फेब्रुवारीच्या बैठकीत देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर करडी नजर राहणार असून, दोषींवर ५०० रुपये दंडाची तरतूद केल्याची माहिती सुरक्षा गार्ड इंचार्ज राजेंद्र वानखडे यांनी दिली.
भाजीपाला व फळ यार्डात रोज सकाळी किरकोळ व्यावसायिकांसह नागरिकांची आवक-जावक राहते. वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविणे आणि वाहतूककोंडी होऊ नये, तसेच व्यापाऱ्यांच्या मालाच्या सुरक्षेसंदर्भात नवनियुक्त सुरक्षा गार्ड इंचार्ज राजेंद्र वानखडे यांनी ४ फेब्रुवारी रोजी बैठक घेतली. दरम्यान यार्डात रोज सकाळी येणाऱ्या दुचाकी, चारचाकी व मालवाहू वाहनांना अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या वाहनांचा अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने वाहन पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली. इतरत्र वाहने उभी करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्याविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
बॉक्स
येथे लागतील वाहने
कमर्शियल कॉम्प्लेक्ससमोरील खुल्या जागेत तीनचाकी, चारचाकी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली असून, दुचाकी वाहनांकरिता यार्डातील वेगवेगळ्या खुल्या जागेत व्यवस्था करण्यात आलेली आहे. अस्ताव्यस्त वाहने उभी करणाऱ्यावर करडी नजर राहणार असून, तत्क्षण ५०० रुपये दंडदेखील वसूल करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे.
कोट
कोरोनाचा प्रकोप नव्या वर्षात वाढताना दिसत असून भाजीपाला, फळ यार्डात गर्दी वाढत आहे. नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने बैठक घेतली. दोषींवर ५०० रुपये दंड आकारला जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
- आर.पी. वानखडे,
सुरक्षा रक्षक इंचार्ज, बाजार समिती