पेंच, ताडोबा जंगल सफारी १ जुलैपासून होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:14 AM2020-06-16T11:14:15+5:302020-06-16T11:17:39+5:30
राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वनविभागानेसुद्धा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १ जुलैपासून पेंच, ताडोबा येथे जंगल सफारी सुरू होईल.
गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊनमुळे बंद असलेली पेंच, ताडोबातील जंगल सफारी १ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वनउद्याने, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचे नियोजन वनविभागाने आखले आहे.
कोरोनाच्या उद्रेकानंतर मार्चपासून वनउद्याने, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात पर्यटकांना मनाई आहे. लॉकडाऊनच्या काळात व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करीत सम-विषम तारखांना बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वनविभागानेसुद्धा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १ जुलैपासून पेंच, ताडोबा येथे जंगल सफारी सुरू होईल. त्यानंतर मेळघाट, वर्धा येथील बोर अभयारण्य, मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री, यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्य, अमरावती येथील बांबू गार्डन सुरू होणार आहे.
वनविभागाला कोट्यवधींचा फटका
लॉकडाऊनमुळे पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी बंद असल्यामुळे गत तीन महिन्यांत वन विभागाचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले आहे. येथे वाघांचे दर्शन व निसर्ग अभ्यासासाठी विदेशी पर्यटकांची होणारी गर्दी थांबली आहे. जंगल सफारीमुळे स्थानिकांनासुद्धा रोजगार मिळतो; पण तोदेखील बंद झाला आहे. आता १ जुलैपासून जंगल सफारी सुरू होत असल्याने पुन्हा व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात रेलचेल वाढणार आहे.
मेळघाटात जंगल सफारीवर भर
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पेंच, ताडोब्याच्या तुलनेत पर्यटकांची संख्या नगण्य आहे. आता मेळघाटात जंगल सफारी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता मेळघाटात चार हत्ती आणले आहेत. लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदीचे निर्बंध असून, ते हटताच मेळघाटात जंगल सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.
१ जुलैपासून पेंच, ताडोबा येथे जंगल सफारी सुरू होत आहे. कोरोना नियमावलीचे पालन करूनच पर्यटकांना जंगलात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर मेळघाटसह अन्य अभयारण्य, वनउद्याने सुरू होतील.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर.