धामणगाव शहरवासीयांना कधी कळणार पाण्याची किंमत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:22 AM2019-04-28T01:22:31+5:302019-04-28T01:22:53+5:30
पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.
मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : पाणी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, दररोज घरातील पाणी शिळे झाले म्हणून ते फेकून नव्याने भरणे, आंघोळीसाठी भरमसाठ पाणी वापरले जाणे, यावरून शहरवासीयांना पाण्याची किंमत कळणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बगाजी सागर प्रकल्पात अल्प पाणीसाठा असल्याने शहरवासीयांना आगामी काळात दोन दिवसाआड पाणी मिळणार आहे.
सुमारे २५ हजार लोकसंख्येच्या शहरात बाराशे कुटुंब भाड्याने राहतात. तूर्तास शहरवासीयांसाठी ८५ व्हॉल्व्हमधून दिवसाआड पाणी सोडले जाते. ज्या बगाजी सागर धरणातून शहराला पाणी मिळते. त्या धरणात अल्प पाणीसाठा असल्याने आगामी काळात दोन दिवसाआड पाणी सोडले जाणार आहे. शहरवासीयांना दरडोई ७५ लिटर पाणी मिळत असले तरी या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने शहरात होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सध्या उन्हाचा पारा ४५ अंशावर पोहोचल्याने कूलरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात आहे.
कपडे धुवायला अधिक पाणी
एखादी वस्तू मुबलक मिळाली की, त्या वस्तूची किंमत कळत नाही. पाण्याचेही तसेच. कपडे धुण्यासाठी अधिक पाणी वापरले जाते. दररोज शॉवरखाली आंघोळ करणाऱ्यांची संख्या कमी नाही. बकेटीत पाणी घेऊन आंघोळ केली, तर १८ लिटर पाणी लागते. शॉवरखाली आंघोळ केल्यास १०० लिटर पाणी लागते. वाहत्या नळाखाली हात धुणे, शौचानंतर फ्लशचा वापर अशा सवयी लागल्या असल्याने आगामी काळात धामणगाव शहराला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बगाजी सागरात पाणी कमी प्रमाणात
बगाजी सागर धरणात अल्प पाणीसाठा आहे.पावसाळयास सुरुवात होईपर्यंत प्रत्येक नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी सांघिक प्रयत्न करावेत, असे आवाहन धामणगाव रेल्वेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी केले.
उन्हाळ्यात धामणगाव शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, बगाजी सागर धरणातून शहराला कमी पाणीपुरवठा होतो. आगामी काळात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून करावा.
- सुमेध अलोने
मुख्याधिकारी, धामणगाव रेल्वे