लाचखोरीत दलालांचा टक्का मोठा, ५९१ जण हवालातीआड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:37+5:302021-09-27T04:13:37+5:30
कॉमन प्रदीप भाकरे अमरावती : सरकारी खात्यांमधील लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना त्यात खासगी व्यक्तींच्या आडून लाच घेणाऱ्यांची ...
कॉमन
प्रदीप भाकरे
अमरावती : सरकारी खात्यांमधील लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना त्यात खासगी व्यक्तींच्या आडून लाच घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढतीच आहे. यावर्षी २३ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास ५५५ प्रकरणांत एकूण ७७० जणांवर कारवाई करण्यात आली. यात वर्ग १ चे ५६, वर्ग २ चे ७९, वर्ग ३ चे ४१६ व वर्ग ४ च्या ७६ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. १०६ खासगी व्यक्तींविरूद्धदेखील लाचखोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सन २०१८ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत एसीबीने तब्बल ५९१ खासगी व्यक्तींविरोधात लाचखोरीचे गुन्हे नोंदविले.
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, ठाणे अशी आठ परिक्षेत्रे आहेत. यात जानेवारी ते २३ सप्टेंबर दरम्यान एसीबीने ५५५ सापळे यशस्वी केले. त्यातील एकूण लाचखोरीची रक्कम १ कोटी ५७ लाख ७०१ रुपये अशी आहे. यात १०६ खासगी व्यक्तींनी तब्बल ७ लाख ९४ हजार १ रुपये लाच घेतल्याची नोंद एसीबीकडे आहे. यात नेहमीप्रमाणे महसूल पहिल्या तर, पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावर ‘विराजमान’ आहे.
लाच घेताना पकडले जाऊ नये म्हणून अधिकाऱ्यांकडून लाच घेण्यासाठी खासगी व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. लाच घेताना पकडले जाण्याची भीती अधिकारी कर्मचाऱ्यांना असते. त्यामुळे वर्ग १ व २ चे अधिकारी लाच घेण्यासाठी सहसा पुढे येत नाहीत. त्यासाठी त्यांच्याकडून एजंट, खासगी व्यक्तींचा वापर केला जात आहे. या खासगी व्यक्ती या अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असतात. ते व्यक्तीच अधिकाऱ्यांच्यावतीने सर्व तडजोड करतात. त्यासाठी अधिकाऱ्यांकडून त्यांना कामानुसार विशिष्ट टक्केवारी ठरवून दिलेली असते. अधिकारी कोठेही पुढे येणार नाही, याची दक्षता खासगी व्यक्तींकडून घेतली जाते. मात्र, अलीकडच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ५९१ खासगी व्यक्तींना हवालातीआड करण्यात एसीबीला यश आले आहे.
////////////////
वर्ष : सापळा प्रकरणे : एकूण आरोपी : खासगी व्यक्ती
२०१८ : ८९१ : ११८१ : १५२
२०१९ : ८६६ : ११७६ : १८३
२०२० : ६३० : ८६३ : १५०
२०२१ : ५५५ : ७७० : १०६
///////////////
अशी उकळली रक्कम
सन २०१८ मध्ये लाचखोरांनी एकूण ४ कोटी ४४ लाख ८ हजार ३७८ रुपये लाच उकळली. त्यात खासगी व्यक्तींची लाचखोरी १ कोटी ७६ लाख ६ हजार ३०० रुपये राहिली. सन २०१९ मध्ये एकूण लाचखोरी १ कोटी ८३ लाखांच्या घरात राहिली. सन २०२० मध्ये ८६३ लाचखोरांनी १ कोटी ५४ लाख ९३ हजार ४० रुपये उकळले. यात १५० खासगी व्यक्तींच्या खिशात ७ लाख ६६ हजार ८०० रुपये गेले. जानेवारी ते २३ सप्टेंबर २०२१ दरम्यान, ५५५ प्रकरणात ७७० जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यातील १०६ खासगी व्यक्तींविरुद्ध ७ लाख ९४ हजार रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
////////