जिल्ह्यात काँग्रेस, अपक्षांचा टक्का घसरणार

By admin | Published: October 18, 2014 12:48 AM2014-10-18T00:48:08+5:302014-10-18T00:48:08+5:30

जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

The percentage of Congress, independents in the district will decline | जिल्ह्यात काँग्रेस, अपक्षांचा टक्का घसरणार

जिल्ह्यात काँग्रेस, अपक्षांचा टक्का घसरणार

Next

अमरावती : जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी काँग्रेस, अपक्षांची संख्या रोडावेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आले होते. यात तिवसा येथून यशोमती ठाकूर, अमरावतीतून रावसाहेब शेखावत, मेळघाटमधून केवलराम काळे तर धामणगाव रेल्वे मतदारसंघातून वीरेंद्र जगताप यांचा समावेश होता. अपक्ष म्हणून बडनेऱ्यातून रवी राणा, मोर्शीतून अनिल बोंडे तर अचलपुरातून बच्चू कडू विजयी झाले होते. शिवसेनेला दर्यापूर मतदारसंघात विजय मिळविता आला. परंतु या निवडणुकीत युती, आघाडी संपुष्टात आल्यानंतर भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अख्खा महाराष्ट्र भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंजून काढला. त्यामुळे शहरी भागात मोदीलाटेचा परिणाम जाणवला. भाजपचे शेवटपर्यंत लढतीत नसलेले उमेदवार ऐनवेळी स्पर्धेत आले. हिंदुत्व विचारसरणीच्या मतदारांनी भाजप उमेदवारांच्या बाजुने कौल दिल्याचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होऊ लागले आहे. गुप्तचर यंत्रणेने सुद्धा हाच अंदाज वर्तविला आहे. चार ते पाच जागा भाजपला मिळतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या; आता भाजपला चार जागा मिळण्याचे संकेत आहेत. गत विधानसभा निवडणुकीत तीन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. मात्र, आता अपक्षाला एकच जागा मिळविता येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
थोड्या फार मतांचे बदल झाल्यास शिवसेनेला दोन ते तीन जागांवर विजय मिळवता येईल, अशी मतदानानंतरची परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. गत निवडणुकीत एकही जागा भाजपला मिळवता आली नव्हती. मात्र, यंदा चार ते पाच जागांवर विजयाची अपेक्षा आहे. शिवसेनेचे गड असलेल्या बडनेरा, दर्यापूर व तिवसा मतदारसंघात भाजपने दमदार उमेदवार मैदानात आणून सेनेला घाम सुटल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले. युती, आघाडीची ताटातूट झाल्यानंतर बसपने खाते उघडण्याच्या उद्देशाने धामणगाव, अमरावती, अचलपूर मतदार संघात अनुक्रमे अभिजीत ढेपे, मिर्झा नईम बेग, हाजी रफीक सेठ यांना उमेदवारी देऊन जोरदार ‘फिल्डींग’ लावली. मात्र बसपचा हत्ती फार धावला नाही, असे मतदानानंतर दिसून आले. तरीही बहुजन समाज पक्ष निकालामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याची चिन्हे आहेत. एकूणच राजकीय विश्लेषकांच्या अंदाजांवरून सध्या तरी जय-पराजयाची गणिते बांधली जात आहेत.

Web Title: The percentage of Congress, independents in the district will decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.