‘स्थायी’च्या शिफारशीचेच बजेट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 09:29 PM2019-03-10T21:29:46+5:302019-03-10T21:30:13+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने यंदा महापालिकेच्या अंदाजपत्रकाला आमसभेची मंजुरी मिळणार नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारीला आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केलेले बजेट व त्यामध्ये समितीद्वारा महसुली खर्चात ५३ कोटींची शिफारस कायम आहे. यासाठी महापालिका स्वनिधीत ४८ कोटींची कर्जउभारणी करणार आहे व स्थायीनेच शिफारस केलेले अंदाजपत्रकच यंदा कायम राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने यंदा महापालिकेच्या अंदाजपत्रकाला आमसभेची मंजुरी मिळणार नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारीला आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केलेले बजेट व त्यामध्ये समितीद्वारा महसुली खर्चात ५३ कोटींची शिफारस कायम आहे. यासाठी महापालिका स्वनिधीत ४८ कोटींची कर्जउभारणी करणार आहे व स्थायीनेच शिफारस केलेले अंदाजपत्रकच यंदा कायम राहील.
स्थायी समितीचे सभापती विवेक कलोती यांनी १ मार्चला राजीनामा दिल्यानंतर नव्या सभापतीची निवडणूक प्रक्रिया ८ मार्चला झाली. त्यामुळे आमसभा बोलवायची झाल्यास सभापतींनी पदभार स्वीकारल्यानंतर किमान तीन पूर्वी सर्वसाधारण सभेची नोटीस सदस्यांना द्यावी लागते. त्यामुळे महापालिकेची आमसभा ही १२ मार्चपूर्वी होणे शक्य नाही व रविवारपासून आचारसंहिता लागल्याने यंदाच्या अंदापत्रकाला आमसभेची शिफारस मिळण्याचीही शक्यता नाही. हा तांत्रिक लोचा निर्माण झाल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम ९५ अन्वये आयुक्तांनी स्थायी समितीसमोर मांडलेले व समितीने त्यावर शिफारस केल्यानंतर कलम ९६ अन्वये सर्वसाधारण सभेसमोर स्थायीच्या सभापतींनी मांडावयाचे बजेट हे अंतिम समजण्यात येईल. आचारसंहितेनंतर सभा झाल्यास कलम १०० अन्वये या अंदाजपत्रकात शिफारसी सुचविण्यात आल्यानंतरचे अंदाजपत्रक उर्वरित आर्थिक वर्षासाठी अंमलबजावणी करण्याची अधिनियमात तरतूद आहे.
आयुक्तांनी आरंभिक शिल्लक पकडून महसुली उत्पन्नाचे ३१० कोटी ५७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादरीकरण केले होते. त्यामध्ये स्थायी समिती सदस्यांद्वारा ५३ कोटींची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे लेखाविभागाद्वारा ३६१ कोटी ९१ लाखांच्या महसुली खर्चाचे अंदाजपत्रक कायम राहणार आहे. आरंभीची शिल्लक १५२.२१ कोटी, महसुली खर्च ३९१.९१ कोटी, भांडवली खर्च ४४१.४६ कोटी व प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाज ९.६९ असे ९६५ कोटी २७ लाखांचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेच्या शिफारसी शिवाय कायम राहणार आहे.
३६१.९१ कोटींचा महसुली खर्च
आयुक्तांनी ३१०.२७ कोटींचा महसुली खर्च स्थायी समितीसमोर सादर केला होता. यामध्ये स्थायी समिती सदस्यांनी शिफारस केल्यानुसार ३६१.९१ कोटींचा महसुली खर्च राहील. यात सामान्य प्रशासन विभागाचा ५८.४२ कोटी, सार्वजनिक सुरक्षितता २९.५२ कोटी आरोग्य सुविधा १२७ कोटी, शिक्षण विभाग ३८.९२ कोटी, अंशदाने, अनुदान १० लाख, संकीर्ण २.७० कोटी, महापालिकेचास्वनिधी १०४ कोटी ३५ लाखांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त २.७३ कोटींची प्रारंभिक शिल्लक आहे.
१२५.६२ कोटींचा बांधील खर्च
महापालिकेचे एकूण महसुली उत्पन्न २७४.४७ कोटी आहे. यामध्ये १२५. ६२ कोटींचा बांधिल खर्च आहे. यामध्ये ास्थायी आस्थापना ५.९६ कोटी, स्थायी आस्थापना ८३.९८ कोटी, वीज देयके १५ कोटी, निवृत्तीवेतन २२ कोटी, निवृत्तीवेतन अंशदाने २.७५ कोटी, पाणीपुरवठा देयके १.३० कोटी, अनामत ठेवी १.८५ कोटी, सुरक्षा रक्षक देतके ३ कोटी, मानधन (कंत्राटी) १ कोटी, महापालिका निधी समभाग १० कोटींचा राहणार आहे. अंदाजपत्रकाच्या २० टक्के भूसंपादनावर, ५ टक्के महिला व बालविकास, ५ टक्के अंपगावर, मागासवर्ग कल्याणकारी योजनेवर ५ टक्के व वृक्ष प्राधिकरणावर ०.५ टक्के खर्च करावा लागणार आहे.