इच्छुकांच्या गर्दीत स्थायीचे चेहरे ठरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:53 PM2018-02-10T22:53:19+5:302018-02-10T22:54:53+5:30
महापालिकेची तिजोरी म्हणून ओळख असलेल्या स्थायी समितीत जाण्यासाठी डझनावर इच्छुक समोर आल्याने भाजप कोअर कमिटीची पंचाईत झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिकेची तिजोरी म्हणून ओळख असलेल्या स्थायी समितीत जाण्यासाठी डझनावर इच्छुक समोर आल्याने भाजप कोअर कमिटीची पंचाईत झाली आहे. ‘अभी नही तो कभी नही’च्या धर्तीवर बहुतांश नगरसेवकांनी ताणून धरल्याने बैठकांचा रतीब घातला जात आहे. काँग्रेस व एमआयएममध्ये भाजपसारखी स्पर्धा नाही. भाजपमधून स्थायी समितीत जाण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग असल्याने नव्या चेहऱ्यावर आमसभेच्या पूर्वसंध्येलाच अंतिम शिक्ककमोर्तब केले जाणार आहे.
नजर सभापतिपदावरच
स्थायी समितीच्या १ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीदरम्यान काढण्यात आलेले ईश्वरचिठ्ठीने आठ सदस्य बाद झालेत. यात भाजप-काँग्रेसचे प्रत्येकी तीन आणि एमआयएमच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. १६ सदस्यीय स्थायीची रचना पूर्ण करण्यासाठी आता नव्याने आठ सदस्य पाठविले जातील व त्यातून स्थायी समिती सभापतीची निवड होईल. १६ सदस्यीय स्थायीत भाजपचे नऊ सदस्य असल्याने सभापती भाजपचाच होईल, ही जरी काळ्या दगडावरची रेघ असली तरी सभापतिपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने पेचप्रसंग उभा ठाकला आहे.
काँग्रेस व भाजपकडून प्रत्येकी तीन व एमआयएमकडून दोन सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षस्तरावर बैठकांचा रतीब घातला जात आहे. भाजपमध्ये ती कुत्तरओढ अधिक तीव्र आहे. १७ फेब्रुवारीला महापालिकेची आमसभा होत असून, त्यात ही नावे पक्षनेत्याकडून मागविली जातील. त्यानंतर पीठासीन सभापती त्या नावांची अधिकृत घोषणा करतील. त्यामुळे भाजपसह काँग्रेस व एमआयएम सदस्यांची नावे १६ फेब्रुवारीला रात्री निश्चित करण्यात येतील.
भाजपमध्ये तीव्र स्पर्धा
४९ सदस्यीय भाजपच्या गोटातून स्थायीत जाण्याची धडपड अधिक तीव्र झाली आहे. महापौर, उपमहापौर, झोन सभापती व सभागृहनेता वगळता अनेकांनी त्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. तुषार भारतीय आणि विवेक कलोती हेसुद्धा नव्याने थेट सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. भाजपमधून तीन डझनांहून अधिक सदस्य स्थायीत जाण्यासाठी इच्छुक असताना भारतीय व कलोतींना पुन्हा पाठवायचे की कसे, यावर जोरदार मंथन सुरू आहे. कोअर कमिटीत निर्णय न झाल्यास हा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात पाठविण्याच्या मानसिकतेपर्यंत भाजप आली आहे.
काँग्रेसकडून अनुभवाला प्राधान्य
१० सदस्यीय एमआयएममधून स्थायी समितीमध्ये दोन सदस्य नव्याने पाठविण्यात येतील. सभागृहात लक्ष वेधून घेणारे या पक्षाचे गटनेता अ. नाजीम हे स्वत:च स्थायीत जाण्याची अधिक शक्यता आहे. काँग्रेसकडून अनुभवी सदस्यांना संधी दिली जाईल, असे संकेत मिळत आहेत. १५ सदस्यीय काँग्रेसचे तीनही सदस्य स्थायीतून बाहेर पडले. नव्याने पाठविण्यात येणाऱ्या चेहऱ्यांमध्ये अनुभवी सदस्य असू शकतात.