अवैध वृक्षतोडीला वडाळीतून परवानगी
By admin | Published: April 1, 2016 12:42 AM2016-04-01T00:42:53+5:302016-04-01T01:00:20+5:30
अतिउच्च दाबाची विद्युत टॉवर लाईन टाकण्याची कामे सुरु असून या टॉवर लाईनखालील वृक्षतोड केली जात आहे.
पासेसमध्ये गौडबंगाल : वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून चाचपणी
अमरावती : अतिउच्च दाबाची विद्युत टॉवर लाईन टाकण्याची कामे सुरु असून या टॉवर लाईनखालील वृक्षतोड केली जात आहे. मात्र, टॉवर लाईनच्या नावाखाली अन्य ठिकाणचे अवैध वृक्षतोड केली जात असताना ही परवानगी मात्र वडाळीतून देण्यात आल्याची माहिती आहे.
मागील आठवड्यात सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांच्या नेतृत्वात वलगाव मार्गावरील नेहा वूड, वाह ताज या आरागिरण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात आडजात लाकडांचा साठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार या दोन्ही आरागिरणी मालकांवर प्राथमिक वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र नेहा वूड इंडस्ट्रिजमध्ये आढळलेला लाकूडसाठा हा परवानगीपेक्षा अधिक असल्याचा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान लाकडाची परवानगी तपासली असता वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयातून सर्वाधिक वृक्षतोड परवानगी पासेस दिल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. अवैध वृक्षतोड केल्यानंतर हे वृक्ष नियमानुसार कापण्यात आलेत, यासाठी परवानगी पासेस देखील वडाळीतून निर्गमीत करण्यात आल्याची माहिती आहे. मोर्शी, वरुड, भातकुली या परिसरात विद्युत टॉवर लाईनखाली वृक्ष तोड करण्यात आली असताना या वृक्ष तोडीला सुद्धा वडाळीतून परवनागी देण्याचा प्रताप करण्यात आला आहे. त्यामुळे आरागिरणी मालकांच्या अवैध प्रकारावर वडाळीतील वनाधिकारी फारच मेहेरबान असल्याचे दिसून येते. पंचनामा केल्याशिवाय वृक्षतोड करता येत नाही. परंतु वडाळीतून विनापंचनाम्याने वृक्षतोडीची परवानगी देण्यात आली आहे. यात आरागिरणी मालक आणि वनाधिकाऱ्यांमध्ये मोठे ‘डील’ झाल्याचे बोलले जात आहे. नेहा वूड आणि वाह ताज या आरागिरण्यांमध्ये आंब्याचे लाकूड मोठ्या प्रमाणात आढळले. याप्रकरणी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे हे बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. नेहा वूडमध्ये वडाळीतून ६७ वृक्षतोडीच्या पासेस देण्यात आल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र, लाकडाचा साठा कितीतरी पट अधिक आढळला आहे. वन कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी लाचघेताना पकडल्याने त्यामुळे अवैध लाकूडतोड, वाहतूक परवानगीसाठी मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे याबद्दल अनेक शंका घेतल्या जात आहेत.