परमिट दिले, मात्र बियाणे उपलब्ध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:38+5:302021-06-18T04:09:38+5:30
वनोजा बाग : खरीप हंगाम २०२१ साठी शेतकऱ्यांना सोयाबीन उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणाचे परमिट ...
वनोजा बाग : खरीप हंगाम २०२१ साठी शेतकऱ्यांना सोयाबीन उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणाचे परमिट (परवाने) तालुका कृषी कार्यालयामार्फत देण्यात आले; परंतु शेतकरी बियाणे घेण्यास गेले असताना बियाणेच उपलब्ध नसल्याने महाबीजने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची चर्चा असून या वांझोट्या परवान्याचे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सविस्तर वृत्त असेल, की मागील वर्षी सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता आणि पावसाअभावी चांगल्या प्रतीच्या बियाणाचे उत्पादन कमी झाले. यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बियाणांसाठी महाबीजमार्फत ऑनलाइन नोंदणी करण्यास सांगितले. त्यानुसार तालुक्यातील ऑनलाइन शेतकऱ्यांनी नोंदणी केली व ऑनलाइन शेतकऱ्यांना सोयाबीनचे परवाने मिळाले; परंतु परवाने घेऊन शेतकरी कृषी सेवा केंद्रात गेले असता महाबीजचे बियाणेच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नाव नोंदणीचा खर्च तर वायाच गेला. सोबत बियाणेही मिळाले नाही. तालुक्यात ऑनलाइन शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना फक्त ऑनलाइन शेतकऱ्यांनाच बियणे मिळणे अपेक्षित असताना त्यांनाही महाबीज बियाणे उपलब्ध करून देऊ शकत नसेल, तर महाबीजने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया
१) यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी मनोहर कोरे यांच्याशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांनी आमच्याकडून परवाने नेले; परंतु बियाणे खुल्या बाजारात विक्री करण्याचा आदेश महाबीजने दिल्याने बियाणे उपलब्ध नसल्याचे समजते. २) यासंदर्भात महाबीजचे अधिकारी संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता १२ तारखेपर्यंत ५०% बियाणांची उचल न झाल्याने खुल्या बाजारत बियाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले.
३) चांगली उगम क्षमता असलेले बियाणे म्हणून महाबीजच्या बियाणाकडे बघितले जाते. याच दृष्टीने शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे मिळण्याकरिता ऑनलाइन बुकिंग केली व लकी ड्राॅमध्ये नंबर लागून परमिटसुद्धा मिळवले; परंतु कृषी केंद्रात गेल्यानंतर बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मग एवढा खटाटोप करूनही शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे मिळू शकत नाही, तसेच अजून १०% सुद्धा पेरणी झाली नसताना अचानक महाबीजच्या खुल्या बाजारात विक्री करण्याचा महाबीजचा काय उद्देश असेल?
-सौ. वृषाली सागर साबळे, महिला शेतकरी