वैयक्तिक लाभ योजना : पावसाळ्यात २८ हजार मजुरांच्या हाताला काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 03:25 PM2024-07-18T15:25:30+5:302024-07-18T15:26:04+5:30

मग्रारोहयो : अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, धारणी तालुक्यात कामे

Personal Benefit Scheme: Work for 28 thousand laborers during monsoon | वैयक्तिक लाभ योजना : पावसाळ्यात २८ हजार मजुरांच्या हाताला काम

Personal Benefit Scheme: Work for 28 thousand laborers during monsoon

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून भर पावसाळ्यात जिल्हाभरात ४,२३३ कामे सुरू आहेत. याद्वारे सद्यःस्थितीत २७,५६६ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेसह वृक्षलागवड, फळबाग लागवड, रोपवाटिका, घरकुलाची कामे होत असल्याने दिलासा मिळाला आहे. 


ग्रामपंचायतस्तरावर कामाची हमी देणारी ही योजना ठरली आहे. गतवर्षी दरदिवशी २७३ रुपये, तर यंदा २९७ रुपये अशी मजुरी या कामांवर मिळत आहे. पावसाळ्यात मजुरांची संख्या रोडावली असली तरी कामाच्या शोधात स्थलांतरित होण्याची वेळ मजूरवर्गावर येणार नाही, अशी एकूण स्थिती आहे. ग्रामपंचायतीकडे नमुना अर्जाद्वारे कामाची मागणी व नोंदणी केल्यावर संबंधित व्यक्तीच्या हाताला पंचायत समितीद्वारे काम मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून जॉब कार्डधारक व्यक्तीला केंद्र शासनाच्या वतीने १०० दिवस, तर राज्य शासनाच्या वतीने १६५ असे एकूण ३६५ दिवस म्हणजेच वर्षभर कामाची हमी मिळत आहे. या योजनेद्वारे वैयक्तिक लाभाच्या योजनेद्वारे कुटुंबातील सदस्यांनाच इतरही मजुरांना कामे मिळत आहेत.


तालुकानिहाय सुरू असलेली कामे
सद्यःस्थितीत अचलपूर तालुक्यात ६१७, अमरावती १२६, अंजनगाव सुर्जी ८४, भातकुली १६४, चांदूर रेल्वे १४४, चांदूरबाजार ३७६, चिखलदरा ७९३, दर्यापूर १८७, धामणगाव १३८, धारणी ४२४, मोर्शी ५३८, नांदगाव १४८, तिवसा २१३ व वरुड तालुक्यात २९१ कामे सुरू आहेत.


चिखलदरा, मोर्शी तालुक्यात सर्वाधिक मजूर
अचलपूर १९९२, चांदूर रेल्वे १०१३, अंजनगाव सुर्जी ५८४, अमरावती ८४०, भातकुली ६३८, चांदूरबाजार १९९६, चिखलदरा ६०५१, दर्यापूर ९०३, धामणगाव ६२८, धारणी ३०९१, मोर्शी ५४९९, तिवसा १५००, नांदगाव खंडेश्वर ५६१ व वरुड तालुक्यात २,२७० हातांना काम मिळाले आहे.


"पावसाळ्यात सध्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसह वृक्षलागवड, रोपवाटिका , घरकुल, फळबाग लागवड आदी ४,२३३ कामे सुरू आहेत. याद्वारे २७ हजारांवर मजुरांना रोजगार मिळाला आहे."

- ज्ञानेश घ्यार, उपजिल्हाधिकारी (रोहयो)
 

Web Title: Personal Benefit Scheme: Work for 28 thousand laborers during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.