पेसा निधीत भ्रष्टाचार; ग्रामसेवकांना अभय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:23 PM2018-12-24T22:23:32+5:302018-12-24T22:23:58+5:30
मेळघाटातील आदिवासी जनतेचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासनाने पेसा अंतर्गत कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायत स्तरावर थेट हस्तांतरित केला. संबंधित ग्रामसेवकांनी नियमांचे पालन न करता विविध प्रकारचे साहित्य मनमानी पद्धतीने खरेदी करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे.
श्यामकांत पाण्डेय।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटातील आदिवासी जनतेचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासनाने पेसा अंतर्गत कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायत स्तरावर थेट हस्तांतरित केला. संबंधित ग्रामसेवकांनी नियमांचे पालन न करता विविध प्रकारचे साहित्य मनमानी पद्धतीने खरेदी करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे. या गंभीर प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडली. पंचायत समितीचे सभापती रोहित राजकुमार पटेल यांचे या प्रकरणात नवनीवन खुलासे होत आहेत. तरीदेखील धडक कारवाईचा अद्याप पत्ताच नाही. प्रशासन ग्रामसेवकांना पाठीशी घालत आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
सभापती रोहित पटेल यांनी सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत पेसा निधीतून अंगणवाडी साहित्य खरेदीचे प्रकरण सप्रमाण उचलून धरले आहे. जवळपास नऊ प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले. एका अंगणवाडी केंद्रात सरासरी दीड लाख रुपयांचे तफावतीचे देयक ग्रामसेवकांनी काढले. सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत चार अंगणवाडी केंद्रांमध्ये एकाच प्रकारचे साहित्य खरेदी करून सहा लाख रुपयांची अफरातफर करण्यात आल्याची तक्रार रोहित पटेल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे केली होती.
दोन आठवडे लोटूनही या तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप या गंभीर प्रकरणाकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सदर ग्रामसेवकाला प्रशासन पाठीशी घालत तर नाही ना, अशी चर्चा मेळघाटात नागरिकांमध्ये होत आहे. तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्यामुळे पंचायत समिती सभापती रोहित पटेल यांनी याप्रकरणी पुन्हा नव्याने तक्रार करण्याची तयारी चालविली आहे.
कोणतेही जिल्ह्यातील अधिकारी रुजू होताच मेळघाटातील आदिवासींचे समस्या प्रकषार्ने निकाली काढण्याचे आश्वासन देऊन प्रसिद्धी माध्यमांना आपलेसे करून घेतात. परंतु, कालांतराने असे प्रकरण समोर आले असताना त्यांच्याकडून कारवाईमध्ये सातत्य जाणवत नाही. यामुळे अशा अधिकाºयांकडून मेळघाटातील विकास साध्य होण्याची स्वप्न भंगले आहे.
इतर क्षेत्रातील भ्रष्टाचाराची होणार का चौकशी?
सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत सहा लाख रुपयांच्या निधीचा केवळ पेसा अंतर्गत घोळ झालेला असताना, कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाने पेसाव्यतिरिक्त अन्य निधीमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याची चर्चा आता सुरू झाली. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.