कीटकनाशक फवारणीच्या विषबाधेने शेतमजुराचा मृत्यू, दोन महिन्यांत तीन बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 06:31 PM2017-11-23T18:31:44+5:302017-11-23T18:31:58+5:30
कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथे बुधवारी रात्री शेतमजुराचा बळी गेला.
अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथे बुधवारी रात्री शेतमजुराचा बळी गेला. यापूर्वी दोन शेतक-यांचा बळी गेल्याने दोन महिन्यांतील मृतांची संख्या तीन झाली. मृत युवक कारंजा तालुक्यातील पिंपरी मोखड (जि. वाशिम) येथील रहिवासी असून, काही दिवसांपासून लेहगाव येथे मामाकडे वास्तव्याला होता.
नितीन रामेश्वर सुरजुसे (३०) असे मृताचे नाव आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे लेहगाव येथे राहणारे मामा विजय श्रीनाथ यांच्याकडे वास्तव्याला येऊन तो शेतमजुरी करीत होता. तो तीन दिवसांपासून गावातील एका शेतक-याच्या तुरीवर इमामबेंजाइड या कीटकनाशकाची फवारणी करीत होता. बुधवारी फवारणी करून आल्यानंतर चक्कर येत असल्याने नातेवाइकांनी त्याला दर्यापूर येथील वैद्यकीय व्यवसायी राजेंद्र भट्टड यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे १५ मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. दर्यापूरच्या शासकीय रुग्णालयात गुरुवारी शवविच्छेदनानंतर पिंपरी मोखड या मूळ गावी त्याच्यावर अंत्संस्कार करण्यात आले
अमरावती जिल्ह्यात १ जानेवारी ते आतापर्यंत विषबाधेचे १५३ रुग्ण दाखल झालेत. यापैकी तीन शेतकºयांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये माहुली जहागीर ठाण्याच्या हद्दीतील डवरगाव येथील प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला व येवदा ठाण्याच्या हद्दीत किरण ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला. आता २२ नोव्हेंबरला नितीन सुरजुसे याचा मृत्यू झाला.
कृषी विभागाची माहितीस टाळाटाळ
कीटकनाशकांच्या विषबाधेने शेतमजुराचा मूत्यू झाल्याची माहिती डॉ. राजेंद्र भट्टड यांनी दर्यापूर पोलीस व तालुका कृषी विभागाला दिली असल्याचे ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. वृत्ताच्या दुजो-यासाठी जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी मात्र याविषयी अनभिज्ञता दाखविली. विशेष म्हणजे, विषबाधेने शेतकरी-शेतमजुरांचे विभागात ३५ मृत्यू झाल्यामुळे शासनाने गठित केलेली एसआयटी गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात असतानाच अमरावती जिल्ह्यात आणखी एका शेतमजुराचा विषबाधेने बळी गेला आहे.
कीटकनाशकाच्या विषबाधेने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची माहिती नाही. कृषी विभागाकडून याची माहिती घेतो.
- अभिजित बांगर
जिल्हाधिकारी
लेहगाव येथील नितीन सुरजूसे याला कीटकनाशकाची विषबाधा झाली असल्याचे उपचारादरम्यान लक्षात आले. १५ मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. याची माहिती पोलीस व कृषी विभागाला दिली.
- डॉ. राजेंद्र भट्टड, दर्यापूर