पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:36+5:302021-06-19T04:09:36+5:30
वरूड : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची सातत्याने होणारी दरवाढ ही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार ठरली असून, अनेक कुटुंबे अर्धपोटीच जीवन ...
वरूड : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची सातत्याने होणारी दरवाढ ही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार ठरली असून, अनेक कुटुंबे अर्धपोटीच जीवन व्यतीत करीत आहे. महागाईने त्रस्त झालेल्या गोरगरीब, कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाच्या मजुरीत केवळ तेलच खरेदी करणे शक्य होते, तर उर्वरित जीवनाश्यक वस्तू कशा आणाव्यात, हा प्रश्न पडला आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडे महागाई कमी करण्याची मागणी केली जात आहे.
एकीकडे हाताला काम नाही, तर दुसरीकडे वाढती महागाई यामुळे पोट कसे भरावे, हा प्रश्न असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पालेभाज्यासुद्धा ४० ते ६० रुपये किलो, डाळ १२० ते १४० रुपये किलो, शेंगदाणा तेल २०० रुपये लिटर अशा एक ना वस्तू महागल्या आहेत. वाहतूकदारांमध्येसुद्धा हाच प्रश्न असून, डिझेल ९० रुपये आणि पेट्रोल १०४ रुपये प्रतिलिटर झाल्याने प्रवासासह मालवाहतूकदारांनी दर वाढविले. याचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबावर पडायला लागला आहे.