पेट्रोल पंपमालकाला १० हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:11 AM2021-05-17T04:11:42+5:302021-05-17T04:11:42+5:30
चांदूर रेल्वे : परवानगी नसलेल्या वाहनधारकांना पेट्रोल विक्री केल्याप्रकरणी चांदूर रेल्वेतील एका पेट्रोल पंप मालकाला १० हजारांचा दंड देण्यात ...
चांदूर रेल्वे : परवानगी नसलेल्या वाहनधारकांना पेट्रोल विक्री केल्याप्रकरणी चांदूर रेल्वेतील एका पेट्रोल पंप मालकाला १० हजारांचा दंड देण्यात आला. तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
चांदूर रेल्वे शहरात भारत पेट्रोलियमच्या जी.आर. भूत यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर ही कारवाई रविवारी सकाळी १० वाजता महसूल व नगर परिषदेच्या पथकांनी संयुक्तरीत्या केली. २२ मेपर्यंत कडक निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात लागू आहे. यामध्ये परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना इंधन मिळेल, असे आदेश पेट्रोल पंप मालकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल, डिझेल सुरू राहणार आहे. अन्य कोणालाही दिल्यास पेट्रोल पंप मालकावर कारवाईचा इशारा तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिला होता. तरीही चांदूर रेल्वे शहरातील भूत यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरून परवानगीशिवाय दुचाकीचालकांना पेट्रोल विक्री करीत असल्याचे आढळले.
रविवारी सकाळी कारवाई पथकात मंडळ अधिकारी सतीश गोसावी, चालक श्रीराम वानखडे, नगर परिषदेचे कर्मचारी निखिल तट्टे, आशिष कुकडकर, राजेश शिर्के यांचाही समावेश होता.