पेट्रोलपंपावरची स्वच्छतागृहे खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 09:53 PM2017-11-06T21:53:09+5:302017-11-06T21:53:22+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गंत महापालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये व मुत्रालये सार्वजनिक वापरासाठी खुली करण्याचा आदेश महापालिकेने काढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गंत महापालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये व मुत्रालये सार्वजनिक वापरासाठी खुली करण्याचा आदेश महापालिकेने काढला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या या आदेशाने शहरातील हॉटेल, मंगल कार्यालये, लॉन, सभागृहातील शौचालयांचा सार्वजनिक वापर करता येईल.
ग्राहक नसलेल्या नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व पेट्रोलपंपांच्या ठिकाणी असलेली शौचालये-मुत्रालये सार्वजनिक म्हणून पालिकेने घोषित केले. त्यामुळे पेट्रोलपंपांवर ग्राहक नसलेल्या व्यक्तींना शौचालये वापरता येईल. शहरात २२ पेट्रोलपंप आहेत. ती नागरिकांसाठी खुली झाल्याने रस्त्यावर होणारी अस्वच्छता दूर होणार आहे. या निर्णयाचे सर्वसामान्यांकडून स्वागत केले जात आहे. पेट्रोलपंपावरची स्वच्छतागृहे व मुत्रालयांची क्षमता अधिक नसते, कर्मचारी व ग्राहकांपुरतीच त्यांची क्षमता असून सिवेज टँकही त्याच क्षमतेचा असतो. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विचार न करता हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया पेट्रोलपंपचालकांमध्ये उमटली आहे.
‘स्वच्छता हीच सेवा’ हे ब्रीद समोर ठेवून केंद्र व राज्य सरकारने स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात केली. मागील वर्षी राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा क्रमांक २८१ वा होता. ती नामुष्की टाळून पहिल्या १०० क्रमांकावर येण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. शहर १०० टक्के हगणदारीमुक्त करणे, यावर स्वच्छ सर्वेक्षणाची मदार असून त्यासाठी ४००० गुणांपैकी १२०० गुण आहेत. त्यापार्श्वभूमिवर सामुदायिक, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय उभारणीसह उघड्यावर प्रात:विधी ज्या ठिकाणी उरकला जातो ती ठिकाणे निष्कासित करण्यात येत आहेत.
असे आहेत निर्देश
गृहनिर्माण व नागरीकार्य मंत्रालय दिल्ली यांच्या निर्देशान्वये महाराष्टÑ महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ च्या तरतुदी अन्वये, अमरावती महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल, मंगल कार्यालये, लॉन, सभागृहे तसेच सर्व कंपन्यांचे पेट्रोलपंपांवरील शौचालये/मुत्रालय हे यापुढे सार्वजनिक शौचालय/मुत्रालय म्हणून वापरले जातील व ते सार्वजनिक जनतेकरिता अनुज्ञेय राहील.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील पेट्रोलपंप, सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालये, लॉन, सभागृहातील शौचालये, मुत्रालये यापुढे सार्वजनिक म्हणून वापरल्या जातील.
- हेमंत पवार, आयुक्त, मनपा