जिल्हा सामान्य रुग्णालयात फुलले औषधीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:31 AM2019-06-03T01:31:14+5:302019-06-03T01:31:52+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध औषधी वनस्पतींचा समावेश असलेले ‘ग्रीन स्क्वेअर’ निर्माण करून रुग्णालयाच्या परिसरात औषधी वन फुलवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध औषधी वनस्पतींचा समावेश असलेले ‘ग्रीन स्क्वेअर’ निर्माण करून रुग्णालयाच्या परिसरात औषधी वन फुलवले आहे.
आरोग्याला उपकारक ठरणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची ओळख रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना व्हावी तसेच रुग्णालयाच्या परिसरात हिरवाईतून चैतन्याचे वातावरण पसरावे, या हेतूने हा उपक्रम हाती घेल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.
ओवा, तुळस, मोसंबी, लाजाळू, लेंडी पिंपरी, कढीपत्ता, राई, पुदिना, काटेकोरांटी, डाळिंब, हळद, लिंबू यांसारख्या विविध औषधी वनस्पतींचे उद्यान रुग्णालयात निर्माण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी हिरवाई निर्माण केली आहे. या औषधी वनस्पतींचे गुणधर्म सांगणारे फलकही लावले आहेत. बाल संगोपनासाठी आवश्यक आहार, औषधी वनस्पती व भाज्या यांची माहिती या उद्यानाच्या माध्यमातून मातांना सहजपणे मिळते. नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, परिचारिका, तंत्रज्ञ व सर्व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. या औषधी वनात नेमक्या कुठ्ल्या वनौषधी लावायच्या, त्याबाबत वन आणि सामाजिक वनिकरण विभागाची मदत घेण्यात आली.
परिसर हिरवागार
जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिसर या औषधी वनाने हिरवागार झाला आहे. भरउन्हाळ्यात मोठमोठ्या वृक्षांची पानगळ होत असताना या वनौषधींची निगा राखली जात असल्याने हा संपूर्ण परिसर आल्हाददायी झाला आहे.
रुग्णालये म्हणजे औषधी, सिरिंजचा कुजका वास, अस्वच्छता असलेले ठिकाण ही धारणा दूर करण्यासाठी ‘हिरवा कोपरा’ ही संकल्पना सुचली. अधिनस्थ यंत्रणेलाही ती रुचली. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा ताण थोडा दूर व्हावा, औषधी वनस्पतींची माहिती मिळावी, यासाठी हे औषधी वन साकारले.
- डॉ. श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्य चिकित्सक