‘फार्मसी’ विद्यार्थ्यांचा ‘प्रहार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:46 PM2018-01-01T22:46:06+5:302018-01-01T22:46:24+5:30
फार्मसी अभ्यासक्रमाचे अवाजवी शैक्षणिक शुल्क कमी करण्यासह परीक्षेचा निकाल, अचूक प्रश्नपत्रिका, निकालात गोंधळ आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी ....
आॅनलाईन लोकमत
अमरावती : फार्मसी अभ्यासक्रमाचे अवाजवी शैक्षणिक शुल्क कमी करण्यासह परीक्षेचा निकाल, अचूक प्रश्नपत्रिका, निकालात गोंधळ आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावतीे विद्यापीठावर प्रहार विद्यार्थी संघटनतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कुलगुरू, कुलसचिवांशी चर्चा करून मागणीचे निवेदन सादर केले.
प्रहार संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष अक्षय राऊत यांच्या नेतृत्वात असंख्य विद्यार्थ्यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख आदींची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या पुढ्यात मांडले. दरम्यान, कुलगुरू चांदेकर यांनी फार्मसी अभ्यासक्रमाचे शुल्क कमी करण्याचा अधिकार हा विद्यापीठाला नसून यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल, असा शब्द विद्यार्थ्यांना दिला. त्याकरिता दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागेल, असेही कुलगुरूंनी सांगितले. नियमित परीक्षा शुल्क कमी करणे, ४५ दिवसांच्या आत निकाल लावणे, बॅकलॉग परीक्षेचा निकाल २० दिवसांत जाहीर करणे, पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २० दिवसांच्या आत शुल्क परत मिळावे, प्रश्नपत्रिका अचूक आणि योग्य असाव्यात, विद्यार्थ्यांचे मनोबल खचू नये, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.
विद्यापीठात कामानिमित्त येणाºया विद्यार्थ्यांचे निवास, जेवणाची व्यवस्था करणे, आॅनलाईन निकालाअंती प्रश्नपत्रिका वेळीच मिळाव्यात, उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन योग्य पद्धतीने व्हावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. कुलगुरूंशी चर्चा करतेवेळी अक्षय राऊत, अमोल वाघमारे, ईश्वर राऊत, अतूल वाघमारे, शुभम वाघमारे, शुभम वारणकर, दीपक ढाबे उपस्थित होते.