सहायक प्राध्यापकांसाठी पीएच.डी. अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:42 PM2018-11-13T23:42:47+5:302018-11-13T23:43:08+5:30
विद्यापीठात सहायक प्राध्यापकपदासाठी आता पीएच.डी. पदवी बंधनकारक केली असून, या पदवीशिवाय उमेदवारांना अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा पीएच.डी. संशोधकांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यापीठात सहायक प्राध्यापकपदासाठी आता पीएच.डी. पदवी बंधनकारक केली असून, या पदवीशिवाय उमेदवारांना अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा पीएच.डी. संशोधकांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आहे.
विद्यापीठाने सहायक प्राध्यापकपदासाठी पात्रता व निकष तयार करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्या समितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांची नेमणूक करण्यात आली होती. समितीच्या शिफारशीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने सहायक प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठीचे सुधारित नियम जारी केले आहे. विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापक पदांच्या विविध पात्रता निर्धारित करण्यात आल्या आहेत. त्यात विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये सहायक प्राध्यापकपदासाठी आता पीएच.डी. पदवी अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी सेट किंवा नेट पात्रताधारकांना पीएच.डी.तून सूट होती, तर पीएच.डी. पदवीधारकांना सेट व नेट मध्ये सूट होती. परंतु, आता दोन्ही पात्रता बंधनकारक केल्या आहेत. याशिवाय विद्यापीठांमधील पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या पदांच्या पात्रता व निकषांमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्राध्यापकांचे एपीआय स्कोअर अधिक कठोर करण्यात आले आहेत. यापूर्वी २१ दिवसांचा ओरिएन्टेशन कोर्स करणे बंधनकारक होते. त्यामुळे प्राध्यापक सलग महिनाभर अनुपस्थित राहत होते. त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसत होता. त्यामुळे आता ओरिएन्टेशन कोर्स सात दिवसांचा केला आहे. त्यातही प्राध्यापकांना कोणत्या विषयाचा कोर्स करायचा आहे, ते आधी निवडावे लागणार आहे. त्यात अभ्यासक्रम, परीक्षा विषयक कामे, पेपर सेटिंग यासारख्या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने समितीच्या शिफारशी मान्य केल्या असल्या तरी राज्य सरकारने त्यावर अद्याप अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे नव्या निकष व पात्रतांवर नियुक्ती झाल्यानंतरही राज्य सरकारकडून अध्यादेश निघेपर्यंत त्यांना वेतन मिळणार नाही. सरकारने नव्या निकषांना मंजुरी देऊन त्या लागू करणे आवश्यक आहे.
सहायक प्राध्यापकांचे इंडक्शन होणार
विद्यापीठ निवड समितीने निवडलेल्या प्राध्यापकाला थेट सेवेत घेण्यात येत होते. परंतु, यापुढे तसे होणार नाही. निवड समितीने नियुक्त केल्यानंतर प्रत्यक्ष कामावर रूजू होण्याआधी किमान एक महिन्याचे इंडक्शन कोर्स करावा लागणार आहे. त्यामुळे नवनियुक्त सहायक प्राध्यापकांना अध्यापन कौशल्य, विषयाचे ज्ञान व इतर बाबींचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहेत.
सहायक प्राध्यापक पदासाठी नवे निकष लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता पीएच.डी पदवी असल्याशिवाय या पदासाठी अर्ज देखील करता येणार नाही. येत्या काळात संशोधकांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल.
- डॉ. मुरलीधर चांदेकर,
कुलगुरु, अमरावती विद्यापीठ.