तुमच्या ‘डीपी’वरील छायाचित्राचे मार्फिंग तर होत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 07:10 AM2021-10-05T07:10:00+5:302021-10-05T07:10:01+5:30

Amravati News मुलींचे, महिलांचे छायाचित्रांच्या माॅर्फिंगचे प्रकार घडू लागले आहेत. असाच एक प्रकार नुकताच अमरावती तालुक्यात उघड झाला.

The photo on your DP is not being morphed, is it? | तुमच्या ‘डीपी’वरील छायाचित्राचे मार्फिंग तर होत नाही ना?

तुमच्या ‘डीपी’वरील छायाचित्राचे मार्फिंग तर होत नाही ना?

Next
ठळक मुद्देअमरावती तालुक्यातील तीन महिलांच्या छायाचित्रांचे मार्फिंग, गुन्हा दाखल

 

प्रदीप भाकरे

अमरावती : अलीकडे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. मनोरंजनाचे साधन म्हणून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटरचा वापर वाढल्यामुळे या सायबर गुन्हेगारांना आयतीच मेजवानी मिळते आहे. त्यातून मुलींचे, महिलांचे छायाचित्रांच्या माॅर्फिंगचे प्रकार घडू लागले आहेत. असाच एक प्रकार नुकताच अमरावती तालुक्यात उघड झाला. तीन महिलांचे फोटो माॅर्फिंग करून समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघड झाला. (The photo on your DP is not being morphed, is it?)

             सायबर मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्र डाउनलोड करून, अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाईटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाईल बनविले जातात. नेमका असाच प्रकार अमरावती तालुक्यातील तीन महिलांसोबत घडला. त्यामुळे तरुणी आणि महिलांनो, समाजमाध्यमांवर स्वत:चा फोटो ‘डीपी’ ठेवताना सजग राहा, तुमच्या ‘डीपी’वरील छायाचित्राचे कुणी मार्फिंग तर करीत नाही ना? हेदेखील तपासा, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

समाज माध्यम हे गुन्हेगारांचे अस्त्र ?

या क्षेत्राचा दैनंदिन जीवनात अधिक वापर होऊ लागल्याने गुन्हेगार सायबर गुन्ह्यांकडे वळले आहे. समाज माध्यम म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर ही तर गुन्हेगारांसाठी खुली मैदानेच ठरत आहेत. बॅंकिंग फसवणूक, विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून फसवणूक करणे, फसवे ई-मेल पाठवणे या सर्व गुन्ह्याबरोबरच एकंदर समाज माध्यम हे गुन्हेगारांचे अस्त्र बनत आहे. समाज माध्यमांपैकी व्हॉट्सॲप, इनस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर अधिक प्रमाणात केल्या जात आहे.

असा होईल गुन्हा दाखल

मॉर्फिंग म्हणजे मूळ चित्रामध्ये बेकायदेशीरपणे केलेले बदल, बनावट खातेधारक महिलांची चित्रे डाऊनलोड करून त्यामध्ये बदल करुन ती दुसऱ्या वेबसाईटवर पुन्हा पोस्ट करतात. असे करणे हा आयटी ॲक्ट २००० अंतर्गत गुन्हा आहे. भादंविच्या कमलाखालीही गुन्हेगाराला अटक होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये भादंविचे कलम ३५४, ३५४ ड, व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.

हे घ्या उदाहरण

अमरावती तालुक्यातील एका गावातील तीन महिलांचे फोटो माॅर्फिंग करून त्याचे रूपांतर अश्लील चित्रात करण्यात आले. ती छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट करण्यात आली. १ ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत हा प्रकार घडला. या प्रकारामुळे आपल्या बहिणीसह अन्य दोन महिलांची बदनामी झाली, अशी तक्रार एका महिलेने २ ऑक्टोबर रोजी दुपारी सायबर पोलिसांत नोंदविली. पोलिसांनी एका यूआरएलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

 

महिलांची किंवा तरुणींची छायाचित्र डाउनलोड करून, अवमानना, बदनामी होईल अशाप्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाईटवर रिपोस्ट किंवा अपलोड केली जातात. बनावट प्रोफाईल बनविले जातात. त्यामुळे तरुणी, महिलांनी ‘डीपी’ ठेवण्याबाबत अत्यंत सजग राहायला हवे.

- सीमा दाताळकर,

पोलीस निरीक्षक, सायबर

Web Title: The photo on your DP is not being morphed, is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.