विकास कामांवर आधारित छायाचित्र प्रदर्शनी
By admin | Published: December 2, 2015 12:22 AM2015-12-02T00:22:24+5:302015-12-02T00:22:24+5:30
शासनाने एका वर्षात राबविलेल्या योजना आणि शासकीय विकास कामांचे छायाचित्रांच्या माध्यमातून केलेले प्रदर्शन हा स्त्युत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी काढले.
विभागीय आयुक्तांचे प्रतिपादन : छायाचित्र प्रदर्शनीला सांस्कृतिक भवनात प्रारंभ
अमरावती : शासनाने एका वर्षात राबविलेल्या योजना आणि शासकीय विकास कामांचे छायाचित्रांच्या माध्यमातून केलेले प्रदर्शन हा स्त्युत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी काढले.
विभागीय माहिती कार्यालय व प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित विभागीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापक क्षीप्रा बोरा, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, सहायक संचालक शैलजा वाघ-दांदळे, माहिती सहायक विजय राऊत, फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रदर्शनीमध्ये जलयुक्त शिवार योजना, रोजगार हमी योजना, विभागातील पर्यटन स्थळे, मेळघाटातील विकास कामे, नरनाळा, गाविलगड किल्ले, वरुड येथील संत्रा महोत्सव, मुख्यमंत्री, राज्यपाल, पालकमंत्री, निसर्गसौंदर्य यांच्या उपस्थितीतील विकास कामावर आधारित छायाचित्रांचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी छायाचित्रांचे निरीक्षण केले. प्रदर्शन व स्पर्धा आयोजनातून छायाचित्रकारांना प्रोत्साहन मिळेल व शासनाव्दारे एका वर्षात करण्यात आलेल्या विविध विकास कामांविषयी जनतेला माहिती होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ३ डिसेंबरपर्यंत ही छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुली आहे. छायाचित्र प्रदर्शनीला आ. बच्चू कडू, आ. रवी राणा यांनीही भेटी दिल्या. शासकीय उपक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. त्यासोबतच दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकारिता व जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, छायाचित्रकार आदींनी या प्रदर्शनीला भेट दिली. या प्रदर्शनीचा शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय माहिती विभागाने केले आहे. तीन दिवसीय प्रदर्शनीत आकर्षक छायाचित्रांचा समावेश आहे.