पोलीस वाहनांवर दगडफेक
By admin | Published: June 19, 2017 12:08 AM2017-06-19T00:08:34+5:302017-06-19T00:08:34+5:30
षोडशीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
षोडशीचे आत्महत्या प्रकरण : १८ आरोपी अटकेत, शनिवारी तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : षोडशीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मुलीने मृत्युपूर्वी वडिलांच्या नावे लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार वडिलांनी एका तरूणाकडे अंगुलीनिर्देश केल्याने शहरात शनिवारी रात्री तणावसदृश स्थिती उत्पन्न झाली होती. पोलीस ठाण्यात शेकडोंचा जमाव झाल्यानंतर आरोपी युवकाला अटक करण्याची मागणी लावून धरण्यात आली. वातावरण चिघळत असल्याचे पाहून बडनेरा रेल्वे पोलिसांना पाचारण केले गेले. संतप्त जमावाने रेल्वे पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केल्याने १८ जणांना अटक करण्यात आली.
१८ जणांना ३० पर्यंत पोलीस कोठडी
चांदूररेल्वे : मोगरा येथील ईश्वरी बबन थोटे नामक अल्पवयीन तरूणीने शनिवारी रात्री रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. मुलीने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे मुलीच्या वडिलांनी एका अल्पसंख्यक मुलाचे नाव पोलिसांसमक्ष घेतले. मुलीच्या आत्महत्येसाठी सदर तरूणाला जबाबदार धरून त्याला अटक करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी लावून धरली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान बडनेरा पोलिसांनी गावात प्रवेश करताच विरोधकांनी वाहनावर दगडफेक केल्याने १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदविले. रविवारी गुन्ह्यातील सर्व आरोपींना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती बडनेरा रेल्वे पोलिसांनी दिली.
माहितीनुसार, मोगरा येथून चांदूररेल्वे येथे शिक्षणाकरिता आलेली ईश्वरी थेटे तिच्या मैत्रिणीसोबत चांदूररेल्वे स्थानकावर फिरायला गेली असताना तिने धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. घटनास्थळ बडनेरा रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व ईश्वरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
दरम्यान मोगरा, धोत्रा व चांदूररेल्वे येथील नागरिक मोठ्या संख्येने ग्रामीण रूग्णालयासमोर गोळा झाले होते. आरोपी तरूणाला अटक होईपर्यंत प्रेत न उचलण्याचा पावित्रा घेतला. त्यामुळे तणाव अधिकच चिघळला. यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. संतापलेल्या नागरिकांनी रात्री एक वाजताच्या सुमारास रेल्वे पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केल्याने तणावसदृशी स्थिती निर्माण झाली होती. यात पोलिसांचे वाहन क्षतिग्रस्त झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक व कुऱ्हा, तळेगाव व हतापूर पोलिसांची विशेष कुमक बोलावण्यात आली. यादगडफेकीत एक अधिकारी व सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. दगडफेक व शासकीय मालमत्तेच्या नुकसान झाल्याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली आहे.
पत्रकारांना अटक
या घटनेची माहिती मिळविण्यासाठी आलेले स्थानिक पत्रकार अभिजित तिवारी व प्रशांत कांबळे फोटो घेत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. याबाबत काही पत्रकारांनी विचारले असता त्यांनादेखील अटक केली, असे सांगितले. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर संपूर्ण माहिती देण्यात येईल, असेही उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत यांनी सांगितले.
दोन आरोपी; एकाला अटक
४बडनेरा : चांदूररेल्वे येथील ईश्वरी थेटे आत्महत्येप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. एजाज हुसैन जाकीर हुसैन (२०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर अभिजित गावंडे (२०) याचेही नाव या प्रकरणात येत असून त्याला अटक झालेली नाही. दोन्ही आरोपींवर मृताची मैत्रिण व फिर्यादीच्या जबाबावरून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बडनेरा रेल्वे पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहे. घटनेनंतर तणावजन्य स्थिती उत्पन्न झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांचे अतिरिक्त अधीक्षक दत्ताराम राठोेड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक पंकजकुमार चक्रे करीत आहेत. पोलिसांना या घटनेत आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची शंका असून आरोपींची पोलीस कोठडी मिळविण्याचा पोेलीस प्रयत्न करीत आहेत.
वीरेंद्र जगताप यांची मध्यस्थी
तरूणीच्या आत्महत्येचे प्रकरण चिघळल्याची माहिती मिळताच आमदार वीरेंद्र जगताप तातडीने ग्रामीण रूग्णालयात पोहोचले. त्यांनी पोलीस अधिकारी व मृताच्या कुटुंबियांसोबत चर्चा के ली व मृताच्या नातलगांची समजूत काढली. यानंतर मृताचे नातलग मुलीचे पार्थिव घेऊन मोगरा गावाकडे रवाना झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी मकानदार यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.