सात जुलैनंतर होणार चित्र स्पष्ट
By admin | Published: July 3, 2014 11:17 PM2014-07-03T23:17:57+5:302014-07-03T23:17:57+5:30
शासनाने १० जून रोजी निवडणुकीसाठी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दर्शवून विद्यमान नगराध्यक्षांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली. या निर्णयाविरूध्द काही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर
संभ्रम कायम : नऊ नगराध्यक्षपदांची निवडणूक
अमरावती : शासनाने १० जून रोजी निवडणुकीसाठी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दर्शवून विद्यमान नगराध्यक्षांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली. या निर्णयाविरूध्द काही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर ७ जुलै रोजी नगरविकास विभाग ‘से’ दाखल करणार आहे. यानंतर निवडणूक कधी होणार हे निश्चित होईल.
गुरूवारी राजपत्रात प्रसिध्द अधिसूचनेनुसार नगराध्यक्ष पदाची मुदतवाढ ४ जुलैपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवार २ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मुदतवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षांसोबत कार्यकाळ समाप्त होणाऱ्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने ही निवडणूक होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, शेंदूरजना घाट, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, दर्यापूर येथील नगराध्यक्षपदाला शासनाने १० जून २०१४ रोजी अधिसूचना प्रसिध्द करून सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, शासनाने महिनाभराच्या आत निर्णय फिरवून बुधवार २ जुलै रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय रद्द केल्याने या नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मात्र, याविषयी संभ्रम कायम असल्याचे व याबाबत अधिकृत माहिती नसल्याचे जिल्हा प्रकल्प अधिकारी ए.जी. तडवी यांनी सांगितले.