निपाहचा धसका; डुकरांचे रक्तजल नमुने तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 07:12 PM2018-05-30T19:12:19+5:302018-05-30T19:12:19+5:30

टवाघळांचे वास्तव्य असलेले विस्तीर्ण बंगले किंवा वड, पिंपळ आदी वृक्षांवर आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे.

Pig blood samples checking for Nipah virus | निपाहचा धसका; डुकरांचे रक्तजल नमुने तपासणार

निपाहचा धसका; डुकरांचे रक्तजल नमुने तपासणार

Next

अमरावती : केरळनंतर गोव्यात धुमाकूळ घालणाऱ्या निपाह या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील वराहांचे रक्तजल नमुने (सिरम) तपासण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  जिल्हास्तरावरील पशुसंवर्धन अधिकाºयांशी संवाद साधून वराहांचे रक्त जल नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. 

 निपाह या जीवघेण्या आजाराचा संसर्ग वटवाघळाने खाल्लेली फळे किंवा उष्टे पदार्थ अन्य पशूंच्या खाण्यात येत असल्यास मनुष्यास होण्याचा धोका असल्याचा निष्कर्ष आरोग्य यंत्रणेने काढला आहे. परिणामी वटवाघळांचे वास्तव्य असलेले विस्तीर्ण बंगले किंवा वड, पिंपळ आदी वृक्षांवर आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. गाव, शहरातील अशा परिसरात गावठी वराहांचा मुक्त संचार असल्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तांनी सतर्कता बाळगण्यासाठी रक्तजल नमुने (सिरम) तपासण्याचे निर्देश दिले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रायोगिक तत्त्वावर ५० वराहांचे रक्तजल नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठविण्याचे फर्मान बजावले आहे. आता जिल्हास्तरावर वराहांचे रक्तजल नमुने गोळा करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने युद्धस्तरावर तयारी सुरू झाली आहे. प्रयोगशाळेतून वराहांच्या रक्तजल नमुन्यांचे अहवाल प्राप्त होताच, राज्याच्या कोणत्या भागात निपाह घर करून बसला आहे का, हे स्पष्ट होईल. 

अ‍ॅक्शन प्लॅन तयार
केरळ, गोव्याप्रमाणे निपाहबाबत राज्यात आणीबाणी उद्भवू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्यासह प्रमुख अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. या आजाराबाबत कुणीही गाफील असता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना आदेशित केले आहे. हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी आरोग्य, पशुसंवर्धन विभागाकडे अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

वटवाघळांच्या स्थळाची हायफो केमिकलने फवारणी 
वटवाघळांच्या वास्तव्याचा परिसर, स्थळांवर हायफो केमिकलने फवारणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन विभाग कामास लागला आहे. विशेषत: वटवाघळांचे मूत्र, विष्ठेवर लक्ष ठेवले जाणार असून, वास्तव्याचा परिसर फवारणी करून संपूर्ण निर्जंतुक केला जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळाचा वानवा असल्याने फवारणीसाठी कंत्राटी कर्मचारी नेमण्याची मुभा शासनाने दिली आहे. 

‘‘ दोन दिवसांपूर्वी पशुसंर्वधन आयुक्तांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निपाह रोखण्यासाठी वराहांचे रक्तजल नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार रक्तजल नमुने गोळा करण्यासाठी कर्मचाºयांची बैठक घेतली आहे. लवकरच वराहांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले जातील.
- राजेंद्र पेठे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अमरावती

Web Title: Pig blood samples checking for Nipah virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.