रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांनी प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:13 PM2018-05-06T23:13:21+5:302018-05-06T23:13:52+5:30
धावत्या रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या २० ते २५ वयोगटातील युवकांची टोळी या चोऱ्यांमध्ये सामील असून, अकोला ते बडनेरा आणि बडनेरा ते नागपूर अशी सीमा चोरट्यांनी आखली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धावत्या रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या २० ते २५ वयोगटातील युवकांची टोळी या चोऱ्यांमध्ये सामील असून, अकोला ते बडनेरा आणि बडनेरा ते नागपूर अशी सीमा चोरट्यांनी आखली आहे.
रेल्वेत अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते, तृतीयपंथ्याचा हैदोस, आरक्षण डब्यात अन्य प्रवाशांची गर्दी, चढ्या दराने खाद्य पदार्थाची विक्री अशा एक ना अनेक समस्यांनी रेल्वे प्रवाशी त्रस्त आहे. मात्र, हल्ली उन्हाळा असल्यामुळे रेल्वे गाड्यात तुंडूब गर्दी आहे. नेमके या गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशाचे साहित्य, सामान, मोबाईल, पर्स आदी लंपास करीत असल्याचे चित्र आहे. अमरावती आणि बडनेरा रेल्वे स्थानकावरील आरक्षण कक्ष व तिकीट केंद्रावरही चोरट्यांचा खुला वावर हे रेल्वे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे. धावत्या रेल्वे गाड्यात चोºयांची मोहिम फत्ते करण्यासाठी नवे चेहरे उद्यास आले आहे. अकोलापासून निघालेले चोरटे हे बडनेरा रेल्वे स्थानकादरम्यान चोरीची मोहीम यशस्वी करतात, अशी विश्वसनीय माहिती आहे. पुढे बडनेरा ते वर्धा आणि नागपूर अशा सीमा देखील चोरट्यांनी निश्चित केल्या आहेत. धावत्या रेल्वे गाड्यात चोरटे कोण? याची माहिती रेल्वे पोलिसांना असुनही ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा रेल्वे पोलिसांचा कारभार आहे. प्रमुख धावत्या रेल्वे गाड्यात प्रवाशांच्या संरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांची गस्त असते. मात्र, चोरी करणाºया युवकांची टोळी पोलिसांना दिसू नये, याबाबत आश्चर्य मानले जात आहे. मध्यंतरी रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांना आवर घालण्यात आले होते. मात्र, गत तीन ते चार महिन्यांपासून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये नवख्या युवकांच्या टोळीने चोरींसाठी लक्ष्य केले आहे. अकोला ते नागपूर यादरम्यान रेल्वे गाड्यात सर्वाधिक चोरीच्या घटना होत असल्याचे दिसून येत आहे. गत आठवड्यात अकोला रेल्वे स्थानकावर काचीगुडा- नरखेड एक्स्प्रेसमधून एका युवतीचा चोरट्याने मोबाईल हिसकावून पळ काढला. रेल्वे गाड्यात सतत होणाºया चोरीच्या घटनांवर पोलिसांचे अंकुश नसल्याने चोरट्यांचे मनोबल उंचावले आहे. बरेचदा प्रवाशांची बॅग, सुटकेस अथवा साहित्य चोरीस जात असल्याने तिकीट, पैसे आदी काहीच प्रवाशांकडे राहत नाही. लांबचा प्रवास असल्याने रेल्वेतून उतरून पोलिसात तक्रार करण्यास कोणतेही प्रवासी समोर येत नाही. त्यामुळे रेल्वेत चोरीच्या सातत्याने घटना होत असताना तक्रारी नोंदविल्या जात नसल्याने पोलिसात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे.
पोलिसांची गस्ती ठरतेय ‘वसुली’ पथक
लांब पल्ल्याच्या धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाची गस्त अनिवार्य आहे. त्यानुसार ही गस्त देखील असते. मात्र, गाड्यांमधील पोलिसांचे हे पथक आता ‘वसुली’ गस्त ठरत आहे. या पथकाला रेल्वे पोलिसांच्या सुरक्षिततेचे काहीही घेणे-देणे नाही. गस्तीवर पोलीस हे अनधकिृत खाद्य पदार्थ विक्रेते, विनातिकीट प्रवासी, तृतीयपंथी यांच्याकडून ‘वसुली’ करण्यातच मश्गूल असल्याचे वास्तव आहे.
चोरट्यांमध्ये विशेष समूहाचे युवक
रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटनांची मोहिम फत्ते करण्यासाठी २० ते २५ वयोगटातील युवकांचा समावेश असून, हे युवक विशेष समूहाचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील काही युवक खाद्य पदार्थ विक्रीच्या नावाखाली रेल्वे गाड्यात शिरकाव करतात. प्रसंगी संधी साधून ते चोरी करून धावत्या रेल्वेतून पळ काढत असल्याची माहिती आहे. या प्रकाराला रेल्वे पोलीस जबाबदार आहे.