वैमानिक प्रशिक्षण करारनामा अडकला ?

By admin | Published: November 5, 2016 12:17 AM2016-11-05T00:17:39+5:302016-11-05T00:17:39+5:30

वैमानिक प्रशिक्षणासाठी गोंदिया येथील एका खासगी कंपनीने बेलोरा विमानतळाला पसंती दिली आहे.

The pilot training agreement was stuck? | वैमानिक प्रशिक्षण करारनामा अडकला ?

वैमानिक प्रशिक्षण करारनामा अडकला ?

Next

फ्लार्इंग क्लबचे पत्र : राज्य शासनाकडून हालचाली मंदावल्या
अमरावती : वैमानिक प्रशिक्षणासाठी गोंदिया येथील एका खासगी कंपनीने बेलोरा विमानतळाला पसंती दिली आहे. मात्र राज्य शासनाने अद्यापही करारनामा केला नसल्यामुळे विमानतळावरून प्रत्यक्षात वैमानिक प्रशिक्षणाला प्रारंभ झाला नाही. वैमानिक प्रशिक्षणाची त्वरित परवानगी मिळावी, यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या सीएई आॅक्सफोर्ड एव्हिएशन अ‍ॅकेडमीने बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत वैमानिक प्रशिक्षणाची परवानगी द्यावी, असे पत्र यापूर्वी राज्य शासनाला देण्यात आले आहे. तथापि मध्यंतरी दिवाळीच्या सुट्या आल्यामुळे मंत्रालयातील कामकाजावरही याचा परिणाम झाला आहे. आता कुठे दोन दिवसांपासून प्रशासकीय कामकाजाला सुरुवात झाली आहे. तरीदेखील मंत्रालयातील खऱ्या अर्थाने ७ नोव्हेंबरपासूनच कामकाजाला गती येईल, असे संकेत आहेत. बेलोरा विमानतळाहून वैमानिक प्रशिक्षण सुरू व्हावे, यासाठी आ. सुनील देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्यामुळे स्थानिकांना रोजगाराचे दालन खुले होतील, असा अंदाज आ. सुनील देशमुख यांनी वर्तविला आहे.
बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्याचा नवा प्रस्ताव आल्यामुळे रखडलेली विकासकामे त्वरेने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सामान्य प्रशासन विभागाकडे यादी सादर केली आहे. गोंदिया विमानतळावर वैमानिक प्रशिक्षणासाठी जागा अपुरी पडत असल्याने सोईस्कर विमानतळावरून प्रशिक्षण देण्याचा निर्णय सीएई आॅक्सफोर्ड एव्हिएशन अ‍ॅकेडमीने घेतला आहे.
बेलोरा विमानतळ हे वैमानिक प्रशिक्षणासाठी अतिशय सोयीचे असल्यामुळे राज्य शासनासोबत करारनामा होताच अमरावतीच्या आकाशात प्रशिक्षणाची विमाने उडाण घेतील, यात दुमत नाही. १८ महिने कालावधीचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी वैमानिकांना मिळणार आहे. वैमानिक प्रशिक्षणाची परवानगी मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही एव्हिएशन अ‍ॅकेडमीला लालफितशाही कारभाराचा सामना करावा लागत आहे.
गोंदिया येथील फ्लार्इंग क्लबच्या चमुने बेलोरा विमानतळाची गत महिन्यात चाचपणी करून वैमानिक प्रशिक्षणासाठी होकार दर्शविला होता. राज्य शासनाकडे त्याअनुषंगाने प्रस्तावही सादर केला. मात्र २० ते २५ दिवसांचा कालावधी होऊनही सामान्य प्रशासन विभागाने वैमानिक प्रशिक्षणासाठी करारनाम्याची प्रक्रिया राबविली नसल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने पाठविलेला प्रस्ताव लालफितशाहीत अडकल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)

वळण रस्ता निर्मितीच्या निविदा निघाल्या
बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने युद्धस्तरावर प्रयत्न चालविले आहे. विमानतळाच्या विस्तारिकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा हा ३.८० कि.मी. वळण मार्ग निर्मितीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. लवकरच वळण रस्ता निर्मितीच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल, अशी माहिती बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम. पी. पाठक यांनी दिली.

Web Title: The pilot training agreement was stuck?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.