पिंपळखुटा शाळेची मान्यता रद्द करणार !

By admin | Published: August 20, 2016 11:52 PM2016-08-20T23:52:53+5:302016-08-20T23:52:53+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या ट्रस्टद्वारे चालविण्यात येणाऱ्या श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर या शाळेची मान्यता रद्द करणार ...

Pimpakhula school will be canceled! | पिंपळखुटा शाळेची मान्यता रद्द करणार !

पिंपळखुटा शाळेची मान्यता रद्द करणार !

Next

दिलीप कांबळेंची घोषणा : प्रथमेशचा सर्व खर्च शासन करणार
अमरावती :पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या ट्रस्टद्वारे चालविण्यात येणाऱ्या श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर या शाळेची मान्यता रद्द करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शनिवारी नागपूर येथे केली.
ना. कांबळे यांनी शनिवारी सायंकाळी 'लोकमत' चौकातील खासगी इस्पितळात उपचार घेत असलेल्या प्रथमेश सगणे या नरबळीतून आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या विद्यार्थ्याची भेट घेतली. प्रथमेशची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. डॉक्टरांकडून प्रथमेशच्या प्रकृतीसुधारातील प्रगती जाणून घेतली. यावेळी मानवी हक्क अभियानाचे दादासाहेब क्षीरसागर, प्रभाकर वाळसे, राजा हातागडे, शंकरराव वानखेडे, उषा अडागळे, महादेवराव जाधव, मनोहरराव इंगोले, मनोज कांबळे, विद्यानंद गावंडे, रमेश दुपारे, दिलीप काळे आदींसह विविध समाजबांधवांनी गर्दी केली होती.
अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रम परिसरात उघडकीस आलेला प्रकार चिंताजनक आहे. शासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रथमेश आणि अजय यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे. संबंधित शाळेची प्राथमिक चौकशी करून मान्यता रद्द केली जाईल, अशी घोषण ना. कांबळे यांनी केली. सदर शाळा बंद झाल्यावर त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर उत्तम शाळेत सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली शासनाने
प्रथमेशचा गळा कापल्यानंतर त्याच्या इलाजावर शंकर महाराज यांच्या आश्रम ट्रस्टच्यावतीने खर्च केला जात आहे. प्रथमेशशी घडलेल्या भयंकर प्रकाराचे दु:ख व्यक्त करण्याऐवजी त्याचा इलाज आम्ही करतो आहोत, याचे भांडवल आश्रमप्रेमींद्वारे केले जात आहे. इलाज अर्ध्यावर सोडण्याचा दम प्रथमेशच्या वडिलांना भरला जात आहे, आदी मुद्दे ना. कांबळे यांच्यापर्यंत पोहोचले होते. या सर्व मुद्यांची दखल घेऊन प्रथमेशच्या इलाजाचा खर्च शासन करेल. त्याला अमरावती किंवा नागपुरातील चांगल्यात चांगल्या शाळेत शिक्षण उपलब्ध करून देण्याचीही जबाबदारी शासन स्वीकारत असल्याची घोषणा त्यांनी केली. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांनी मानले 'लोकमत'चे आभार
'लोकमत'ने शोधपत्रकारिता केल्याने नरबळीच्या प्रयत्नांची प्रकरणे उघड होऊ शकलीत. या वृत्तपत्राने केलेले हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ‘लोकमत’चे मी त्यासाठी आभार मानतो, अशा शब्दांत ना. दिलीप कांबळे यांनी प्रथमेश भेटीदरम्यान भावना व्यक्त केल्यात.

Web Title: Pimpakhula school will be canceled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.