सोशल मिडियावरची गुलाबी मैत्री? जरा जपूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:33 AM2017-11-17T11:33:25+5:302017-11-17T11:37:24+5:30
इंटरनेट व स्मार्ट फोनच्या युगाचा फायदा गुन्हेगारी विश्वातील लोक घेत असून आपणाला बेमालूम फसविले जाते. यामध्ये विदेशी महिलांचा वापर अधिक असल्याचा घडलेल्या घटनांवरून दिसून येते.
श्रीकृष्ण मालपे।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : इंटरनेट व स्मार्ट फोनच्या युगात फेसबूक, ई-मेल, व्हॉट्स अॅपवरून संदेशाची देवाण-घेवाण, चॅटिंग आदींमुळे नवीन ओळखी निर्माण होऊन नवनवीन मित्र होत आहे. या ओळखी देशातच नव्हे, तर जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील व्यक्तींशी जवळीक निर्माण करीत आहे. याचाच फायदा गुन्हेगारी विश्वातील लोक घेत असून आपणाला बेमालूम फसविले जाते. यामध्ये विदेशी महिलांचा वापर अधिक असल्याचा घडलेल्या घटनांवरून दिसून येते.
फसवणूक कशी होते
(घटना क्र. १ - प्रेमिकाची)
अमेरिका येथील कंसास शहर. मारी रोजस या ४० वर्षीय महिलेने अमरावती येथील दादाराव (काल्पनिक नाव) यांना फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली. दादाराव यांनी मान्य केल्यावर तिने आपला परिचय हृदयरोगतज्ज्ञ असा दिला. आपण दोन मुलांची विधवा आई आहोत, असे तिने सांगितले. त्यानंतर दादाराव यांनासुद्धा त्यांचे नाव, गाव, पत्ता विचारला. मग रोजच त्या दोघांत मैत्रीपूर्ण मॅसेजचे आदान-प्रदान सुरू झाले. एक ते दीड महिन्यात मारीने त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात घडविले. दादारावच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले असल्याचे सांगितले. तिने मोबाइल नंबर देऊन दादारावला माय डियर, माय डॉर्लींग, माय हनी व शेवटी माय हसबंड यासारखी संबोधने सुरू केली. मॅसेजमध्येसुद्धा ‘माय डियर मला मिठीत घ्याल काय?’ किंवा ‘माय हनी मला किस करा ना’ असे सांगू लागली. त्यामुळे दादाराव हुरळून गेला. दादाराव जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यावर मारीनेही भेटण्याकरिता आपण खूपच आतुर झाल्याचे सांगितले. त्याकरिता तिने भारतात येण्याची तयारीही दर्शविली. सोबत भरपूर पैसे घेऊन येत असून, दादारावच्या शहरात घर व एक कार घेण्याची इच्छाही व्यक्त केली. तसेच दादारावलाही काही रक्कम बक्षीस देणार असल्याचे सांगितले. मारी हिने विमानाच्या तिकिटाचा फोटोही व्हॉट्स अॅप केला. ठरलेल्या तारखेला ती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्याचा मॅसेज दादारावला धडकला. काही वेळातच आपला पासपोर्ट एअरपोर्ट कस्टम अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव जप्त केला असून, त्याकरिता ३५ हजार रुपयांची मागणी केली. सदर रक्कम भेटीअंती परत करू, असा ग्वाही देणारा कॉल धडकला. यावेळी विमानतळावरील कुण्या महिला कर्मचाऱ्यांशी दादारावचे बोलणे करून दिले. रक्कम जमा करण्यासाठी अज्ञात व्यक्तीचा स्टेट बँक आॅफ पतियाळा या बँकेचा खाते क्रमांक दिला. रकमेच्या मागणीकरिता मारी हिने दादाराव यांच्याकडे वारंवार कळकळीच्या विनंती करून मदत करण्याचे आवाहन केले. (तात्पर्य, इमोशनल ब्लॅकमेल केले) हा घटनाक्रम इथेच संपतो. कारण एकदा खात्यात पैशांचा भरणा झाला की, लगेचच पुढची जीवलग झालेली व्यक्ती फेसबुक, व्हॉट्स अॅप, मोबाइल सर्व काही बंद करून आपल्याशी असलेला संपर्क तोडते. तेव्हा आपल्याला कळते की, आपण फसविले गेले आहे.