सावरखेड पिंगळाई येथे सोफीया प्रकल्पाची पाईप लाईन फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:54+5:302021-09-16T04:16:54+5:30
फोटो - लेहेगाव फोल्डर १५ पी वस्तीत शिरले पाणी, नागरिकांचे साहित्य भिजले, लाखोंचे नुकसान कैलास ठाकूर - लेहेगाव : ...
फोटो - लेहेगाव फोल्डर १५ पी
वस्तीत शिरले पाणी, नागरिकांचे साहित्य भिजले, लाखोंचे नुकसान
कैलास ठाकूर - लेहेगाव : अप्पर वर्धा धारणावरून सावरखेड पिंगळाई या गावातून गेलेली सोफीया वीज प्रकल्पात जाणारी पाईप लाईन मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रेशर व्हॉल्व्ह तुटल्याने फुटली व रस्त्याच्या बाजूने वास्तव्यास असलेले नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे दैनंदिन वापराचे साहित्य, कपडे, धान्य, विद्यार्थ्यांची पुस्तके पाण्यात भिजून खराब झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोफीया वीज प्रकल्पाकरिता पाणीपुरवठ्याची पाईप लाईन ही रस्त्याच्या डाव्या बाजूने गेली असून त्याच बाजूने मजुरी करणाऱ्या नागरिकांची वस्ती आहे. मजुरीच्या भरवशावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काल रात्री अचानक मध्यरात्रीनंतर सोफीया प्रकल्पाची मोठ्या प्रेशरची पाईप लाईन फुटल्याने वस्तीत पाणी शिरले. त्यामुळे काही घरांची पडझड होऊन घरातील संपूर्ण साहित्य पाण्यात भिजल्याने त्यांचा जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे लाखोंचे नुकसान झाले असल्याने शासनाने त्वरित पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, सरपंच ललिताताई जोमदे, उपसरपंच रिशिका तायडे,ग्रामपंचायत सदस्य नीलेश टारपे, प्रमोद कळबांडे, लक्ष्मणराव आठवले, भूषण ठवळी, ग्रामसेवक व्ही.यू. मनवर, पटवारी तायडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सोफीया वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर मोर्शीचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे, सोफीया प्रकल्पाचे अधिकारी आशिष धर्माळे, पोकळे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी प्रत्यक्षात पाहणी केली.
रात्र जागून काढली
पाईप लाईनमधील पाणी घरोघरी शिरल्याने वस्तीतील नागरिक खळबळून जागे झाले. ज्याला जे उंचावर ठेवणे शक्य झाले, तेवढेच साहित्य कोरडे राहिल्याची व्यथा या नागरिकांनी मांडली. पाण्यामुळे रात्र त्यांना जागू काढावी लागली.