महिलेवर घरात रोखले पिस्टल; सोने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 05:00 AM2020-11-09T05:00:00+5:302020-11-09T05:00:06+5:30
पोलीस सूत्रांनुसार, प्रदीप मातने (४५, रा. माधवनगर) व शुभांगी प्रदीप मातने (४०) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. शुभांगी मातने या शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास बाहेरून घरी परतल्या. त्यांच्या पाठोपाठ दोन अज्ञातांनी घरात प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरवस्तीतील घरात सायंकाळी साडेआठ वाजता महिलेच्या कानशिलावर पिस्टल रोखून साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या घटनेत पती व पत्नी यांना चाकूने जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना हिंदू स्मशानभूमीनजीक माधवनगरात शनिवारी घडली.
पोलीस सूत्रांनुसार, प्रदीप मातने (४५, रा. माधवनगर) व शुभांगी प्रदीप मातने (४०) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. शुभांगी मातने या शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास बाहेरून घरी परतल्या. त्यांच्या पाठोपाठ दोन अज्ञातांनी घरात प्रवेश केला. ऑटोमॅटिक लॉक असलेले दार बंद केल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने चाकू काढून त्यांच्या मानेवर लावला आणि मंगळसूत्र व अंगठी हिसकली. त्याला विरोध करीत शुभांगी मातने यांनी दाराकडे धाव घेतली. या झटापटीत चोरट्याकडील चाकूचा वार हाताला लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच दुसऱ्याने पिस्टल रोखून त्यांना शांत राहण्यास आणि घरातील पैसे व सोन्याचे दागिने देण्यास फर्मावले. दोघांनी त्यांचे ओढणीने हात बांधून एका खोलीत डांबून ठेवले. चोरट्यांनी यानंतर बेडरूमच्या कपाटातील साहित्याची फेकफाक करून ३ लाख ९२ हजाराचे सोन्याचे दागिने व चार हजार नगदी असा ३ लाख ९६ हजाराचा ऐवज मिळविला. १५ ते २० मिनटे हा थरार सुरू असताना शुभांगी यांचे सराफा व्यवसायिक असलेले पती प्रदीप मातने हे घरी आले. मुख्य दरवाजा त्यांनी दुसऱ्या चावीने उघडला. बेडरूममध्ये चोरी होत असल्याचे पाहताच त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांच्यावर चाकुहल्ला केला व पिस्टल रोखली. यादरम्यान वरच्या माळ्यावर राहणारे त्यांचे बंधू आशिष खाली आले. त्यांची चाहूल लागताच चोरट्यांनी पळ काढला.
प्रदीप मातने यांनी जखमी अवस्थेतच काही अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. चोरट्यांनी काही अंतरानंतर एका दुचाकीचालकाला खाली पाडले. डोक्यावर चाकूची मूठ मारून जखमी केले व दुचाकी घेऊन पळ काढला. यामध्ये दुचाकीचालक नंदू वामनराव कुटे (४२, रा. शिक्षक कॉलनी) हे जखमी झाले. यानंतर नागरिकांनी तिघांनाही उपचाराकरिता खासगी रुग्णालयात नेले.
पोलीस आयुक्त आरती सिंह, उपआयुक्त शशिकांत सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, एपीआय गजानन मेहेत्रे , सहायक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
दुचाकी तीन किमीवर मिळाली
आरोपींची विना क्रमांकाची दुचाकी घटनास्थळावर पोलिसांना आढळली, तर नंदू कुटे यांची पळविलेली दुचाकी (एमएच २७ बीडी ६५३८) तीन किमी अंतरावर टाकून चोरट्यांनी पळ काढला.
आरोपीच्या शोधार्थ चार पथके रवाना
आरोपीच्या शोधार्थ राजापेठ व शहर गुन्हे शाखेचे चार पथके रवाना करण्यात आली आहेत. अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणार, असे सीपी आरती सिंह यांनी सांगितले.
आरोपींकडून परिसरात गोळीबार
आरोपींनी मातने यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर माधवनगरातील परिसरात गोळीबार केल्याचे शुभांगी मातने यांनी ह्यलोकमतला सांगितले. आरोपींनी पळ काढल्यावर लोकांनी आम्हाला दवाखान्यात नेल्याचे त्यांनी सांगितले.