Amravati: पिठेंकडे ‘प्रशासन’, वानखडेंकडे ‘सामान्य’ उपायुक्तपदाचे सुकाणू, शिक्षणाधिकाऱ्यांकडे तिहेरी जबाबदारी
By प्रदीप भाकरे | Published: May 27, 2024 08:18 PM2024-05-27T20:18:49+5:302024-05-27T20:19:13+5:30
Amravati News: महापालिका आस्थापनेवरून पदोन्नतीने उपायुक्तपदी नियुक्ती मिळालेले योगेश पिठे यांच्याकडे प्रशासन उपायुक्तपद सोपविण्यात आले आहे, तर नरेंद्र वानखडे यांना सामान्य उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
- प्रदीप भाकरे
अमरावती - महापालिका आस्थापनेवरून पदोन्नतीने उपायुक्तपदी नियुक्ती मिळालेले योगेश पिठे यांच्याकडे प्रशासन उपायुक्तपद सोपविण्यात आले आहे, तर नरेंद्र वानखडे यांना सामान्य उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र पिठे हे रजेवर असल्याने मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव यांच्याकडे तूर्तास ती जबाबदारी कायम आहे. पिठे हे बुधवारी प्रभार घेण्याची शक्यता आहे.
आयुक्त देवीदास पवार यांनी दि. १७ मे रोजी पिठे, वानखडे व डॉ. प्रकाश मेश्राम यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले होते. त्यानुसार, दि. १७ मे रोजीच मध्यान्हानंतर त्यांना रुजू करून घेत त्यांच्याकडे उपायुक्त सामान्य या पदाचा कार्यभार सोपविण्यात आल्याचा आदेश दि. २१ मे रोजी काढण्यात आला. योगेश पिठे हेदेखील उपायुक्तपदावर दि. १७ मे रोजी मध्यान्हानंतर रुजू झाले असून, त्यांना रुजू करून घेत त्यांच्याकडे उपायुक्त प्रशासन या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार स्वीकारून तसा अहवाल सादर करावा, असे आदेशदेखील दि. २१ मे रोजी काढण्यात आले आहेत.
मेश्रामांकडे दोन चार्ज
पदोन्नतीने एस-२० या वेतनश्रेणीत पोहोचलेले शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांच्याकडे नरेंद्र वानखडे व योगेश पिठे यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या अनुक्रमे महिला व बालविकास अधिकारी व सांख्यिकी अधिकारी अशा दोन्ही पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे, तर मेश्राम यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या महानगरपालिका हिंदी कन्या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाचा चार्ज सहायक शिक्षिका मंगला व्यास यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आरोग्य थेट आयुक्तांकडे की ॲडिशनलकडे?
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पद हे अन्य ‘ड’ वर्ग महानगरपालिकांप्रमाणे एस-२३ या वेतनश्रेणीत आणण्यात आले आहे. तर, दोन्ही उपायुक्तपदे ही एस-२० मध्ये आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग एडीटीपींप्रमाणे थेट आयुक्तांकडे जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभाग ‘एस २३’ या संवर्गातील अतिरिक्त आयुक्तांकडेदेखील राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दस्तूरनगरचे नवे सहायक आयुक्त कोण, याबाबतचा आदेशदेखील निघालेला नाही.
पर्यावरण कुणाकडे?
वानखडे व पिठेंकडील मूळ पदांचा अतिरिक्त कार्यभार शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. मात्र, महेश देशमुख यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या पर्यावरण संवर्धन विभागाचा (विभागप्रमुख म्हणून) अतिरिक्त कार्यभार अद्याप कुणाकडेही सोपविण्यात आलेला नाही. यापूर्वी पर्यावरण संवर्धन अधिकारी व उपायुक्त हे एकाच अर्थात एस-२० या वेतनश्रेणीत मध्ये असल्याने पर्यावरण विभाग थेट आयुक्तांच्या व उच्च वेतनश्रेणीच्या अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आला होता. आता मात्र पर्यावरण अधिकारी व अतिरिक्त आयुक्तपद हे एस- २३ मध्ये असल्याने पर्यावरण थेट आयुक्तांकडे राहण्याची शक्यता असली तरी विभागप्रमुख म्हणून चार्ज कुणाकडे, हे उलगडलेले नाही.