खड्डे दोन फुटांचे अन् रोपे दीड फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:24 AM2019-07-15T01:24:19+5:302019-07-15T01:24:42+5:30
राज्यात १ जुलैपासून ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम धडाक्याने सुरू झाला आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामंपचायतींना दीड फुटांपेक्षा कमी उंचीची रोपे देण्यात आली आहे. ही बुटकी रोपे जगणार कशी, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे वृक्षलागवड मोहीम म्हणजे ‘खड्डे दोन फूट अन् रोपे दीड फूट’ अशी विदारक स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात १ जुलैपासून ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम धडाक्याने सुरू झाला आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामंपचायतींना दीड फुटांपेक्षा कमी उंचीची रोपे देण्यात आली आहे. ही बुटकी रोपे जगणार कशी, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे वृक्षलागवड मोहीम म्हणजे ‘खड्डे दोन फूट अन् रोपे दीड फूट’ अशी विदारक स्थिती आहे.
यंदा जिल्हा परिषदेला २६ लाख ८८ हजार ८५० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी प्रशासनाने २० लाख २८ हजार ७३३ एवढे वृक्षलागवडीचे नियोजन केले असून, त्याकरिता १९ लाख ३५ हजार ३११ वृक्षलागवडीसाठी साधारणत: दोन फुटांचे खड्डे खोदण्यात आले आहेत. ८३९ ग्रामपंचायतींना १९ लाख ३५ हजार ३११ वृक्षलागवडीचे 'टार्गेट' दिले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान ग्रामपंचायतींना वृक्षलागवडीची मोहीम राबवायची आहे. मात्र, ग्रामपंचायतींना उंचीची अथवा मोठ्या स्वरूपाची रोपे उपलब्ध करून न देता छोट्या रोपांचा पुरवठा करण्यात आला आहे. लहान रोपे अधिक काळ जगत नसल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची ओरड आहे. त्यामुळे या रोपांचे संगोपन, संवर्धन कसे करणार, हा बिकट प्रश्न ग्रामपंचायतींसमोर उभा ठाकला आहे.
३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ८३९ ग्रामपंचायतींना 'टार्गेट' दिलेले आहे. यात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ९ लाख ३७ हजार २७७ एवढे उद्दिष्ट आहे. तसेच इतर फंडातून ९ लाख ९८ हजार ४३, असे एकूण १९ लाख ३५ हजार ३११ वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्यात आलेत. वृक्षलागवडीसाठी ग्रामपंचायतींना सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून रोपांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
१८ महिन्यांच्या कालावधीची रोपे का नाही?
वृक्षलागवडीसाठी १८ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेली रोपे मिळावीत, असे अपेक्षित आहे. मात्र, ग्रा.प.ला ९ ते ११ महिन्यांच्या कालावधीत वाढ झालेली लहान आकाराची रोपे पुरविण्यात येत आहेत. ग्रा.प.च्या आदेशानुसार खोदलेले खड्डे दोन फुटांचे असताना रोपे मात्र दीड फुटांचीच आली आहेत. नरेगात वृृक्षलागवडीत झाडांच्या संगोपनासाठी बिहार पॅटर्ननुसार अंमलबजावणी केली जाते. त्याकरिता ३ वर्षांत १६०० वृक्षांचे अंदाजपत्रक २४ लाखांचे आहे. नरेगातून वृक्षलागवडीकरिता १८ महिन्यांची रोपे दिल्यास संगोपनावरील खर्च व्यर्थ जाणार नाही.
नरेगा अंतर्गत वृक्षलागवडीसाठी १८ महिन्यांची रोपे न देता कमी कालावधीची दिली जात आहे. त्यामुळे रोपे जगावी यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना योग्य क्षमतेची रोपे उपलब्ध करून देण्याबाबत लेखी स्वरूपात कळविले आहे.
- मनिषा खत्री, मुख्यकार्यकारी अधिकारी
वृक्षलागवडीसाठी लहान आकाराची रोपे दिल्याची भातकुली तालुक्यातील तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार वृक्षलागवडीसाठी योग्य रोपांचा पुरवठा करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
- शैलेश नवाल जिल्हाधिकारी, अमरावती.
६६६८२ रोपाचे वृक्षारोपण
जिल्हा परिषद रोजगार हमी योजना विभागाकडून १९ लाख ३५ हजार ३११ एवढे खड्डे खोदण्यात आले आहेत. यात नरेगा अंतर्गत ९ लाख ३७ हजार २७७, तर ९ लाख ९८ हजार ०३४ इतर फंड याप्रमाणे वृक्षलागवडीसाठी नियोजन करून खड्डे खोदले आहेत. यासाठी २ लाख ६६ हजार ६३५ एवढ्य रोपांची आवश्यकता आहे. आतापर्यंत ६६ हजार ६८२ रोपांची लागवड १४ तालुक्यांतील विविध ग्रामपंचायतींनी केल्याची माहिती आहे.