मातीच्या कलाकुसरीवर कोरोनाचा पालथा घडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 05:00 AM2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:01+5:30
कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा यातून सुटलेला नाही. रोज कष्ट करून घाम गाळणाºया कुंभार बांधवांचा व्यवसाय टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे ठप्प आहे. मार्चाासून जूनमहिन्यापर्यंत माठ, सुराई, घागर ही थंड पाण्याची भांडी विकली जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : यावर्षी कोरोनाच्या सावटात संचारबंदी करण्यात आल्याने उन्हाळ्यातही कुंभाराचा व्यवसाय थंडावला होता. आता सणासुदीच्या काळात देवाची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांवर कोरोनाने उपासमारीची वेळ आणली आहे. यामुळे यावर्षी कोरोनाचे सावट सर्वांसाठीच कर्दनकाळ ठरत आहे.
कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा यातून सुटलेला नाही. रोज कष्ट करून घाम गाळणाºया कुंभार बांधवांचा व्यवसाय टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे ठप्प आहे. मार्चाासून जूनमहिन्यापर्यंत माठ, सुराई, घागर ही थंड पाण्याची भांडी विकली जातात. त्याच काळात लग्नसराई असते. यामुळे वैवाहिक कार्यक्रमासाठी कुंभार समाजाकडून खास मातीची भांडी तयार करून घेतली जातात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या सावटात लॉकडाऊनच्या काळात हा धंदा पूर्णपणे बुडाला आहे. मातीचे तयार माठ विकले न गेल्यामुळे कुंभार बांधवांचा हजारो रुपयांचा माल पडून आहे. वर्षभर या नाजूक वस्तू सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे.
आता कुंभाराची उरलीसुरली भिस्त गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळीवर अवलंबून आहे. परंतु यातही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरुपात साजरा होणाºया या उत्सवांवरही नियंत्रण येणार आहेत. त्यामुळे ही मंडळी घरगुती प्रतिष्ठानेसाठी तयार होणाºया मूर्ती घडविण्याच्या तयारीला लागली आहेत. पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपले आहेत. निदान या काळात तरी आतापर्यंत झालेले नुकसान भरून निघेल, अशी भावनिक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. घरगुती गणेशमूर्ती, श्रीकृष्ण, गोपिका यांच्या मूर्ती बनविन्यात कुंभार समाजबांधव सध्या व्यस्त झाले आहेत. टाळेबंदीमुळे चार फुटांच्या वर मूर्ती बसविण्यास गणेशोत्सव मंडळांना मनाई आहे. त्यामुळे शहरातील मोठे मूर्तिकारसुद्धा घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात सारी मरगळ, निराशा झटकून कामाला लागले आहे.
केव्हा थांबणार ही होरपळ?
ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नानाविध भांडी तयार करतो. त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांगसुंदर मूर्तीदेखील घडविल्या जातात. या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबांच्या घरातील दोन वेळची चूल पेटते. परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे हा व्यवसाय डबघाईस आला आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेली ही होरपळ अद्यापही संपलेली नाही.
कोरोना संक्रमणामुळे आमच्या व्यवसायाला अवकळा आली. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली. त्यामुळे सार्वजनिक मंडळांकडून ‘श्रीं’च्या मुर्तीच्या आगाऊ मागणीत प्रचंड घट झाली आहे. तीन महिन्यांपासून आमच्या हाताला काम नाही. आता मुर्त्या बनविणे सुरू असले तरी मागणी नाही.
- गजानन रोतळे,
मुर्तीकार, शिरजगाव बंड.