शिवानीच्या हत्येचाच होता अक्षयचा प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:11 PM2018-08-29T22:11:57+5:302018-08-29T22:13:20+5:30
शिकवणी वर्गापासून पाठलाग करीत आलेल्या अक्षय कडूने शिवानीच्या मानेवर पहिला चाकूचा वार केला. तिच्या आणि बाजूने उभ्या मैत्रिणीच्या ओरडण्याचा आवाज ठाण्याबाहेर उभ्या पोलिसांना आला अन् ते त्वरेने अक्षयला पकडण्यासाठी धावून गेले. यामुळे मोठा अनर्थ टळला. खोलापुरी गेट पोलिसांनी शिवानीला तात्काळ आॅटोत टाकून इर्विन रुग्णालयात नेले. तेथून तिला खासगी रुग्णालयात हलवून वेळेत उपचार सुरू करण्यात आले आणि तिचे प्राण वाचले. अक्षय हत्येच्या इराद्यानेच शिवानीवर आणखी चाकूने वार करणार होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिकवणी वर्गापासून पाठलाग करीत आलेल्या अक्षय कडूने शिवानीच्या मानेवर पहिला चाकूचा वार केला. तिच्या आणि बाजूने उभ्या मैत्रिणीच्या ओरडण्याचा आवाज ठाण्याबाहेर उभ्या पोलिसांना आला अन् ते त्वरेने अक्षयला पकडण्यासाठी धावून गेले. यामुळे मोठा अनर्थ टळला. खोलापुरी गेट पोलिसांनी शिवानीला तात्काळ आॅटोत टाकून इर्विन रुग्णालयात नेले. तेथून तिला खासगी रुग्णालयात हलवून वेळेत उपचार सुरू करण्यात आले आणि तिचे प्राण वाचले. अक्षय हत्येच्या इराद्यानेच शिवानीवर आणखी चाकूने वार करणार होता.
एकतर्फी प्रेमात वेडा झालेला अक्षय कडू तोंडाला रुमाल बांधून सोमवारी शिवानीचा पाठलाग करीत होता. या मार्गावर प्रत्येक ठिकाणी वर्दळ व गर्दीचे वातावरण होते. त्यामुळे अक्षय आपला डाव साधण्यासाठी संधी शोधत खोलापुरी गेट ठाण्याच्या मागील रस्त्यावर पोहोचला. तेथे पोलीस ठाणे आहे, याची भनकही अक्षयला नव्हती. रस्त्याने शिवानी व तिच्या मैत्रिणीशिवाय कोणी नसल्याचे त्याने पाहिले आणि थेट शिवानीपुढे जाऊन उभा राहिला. क्षणात शाब्दिक चकमक झाली आणि अक्षयने शिवानीचा एक हात घट्ट धरून त्याने दुसऱ्या हातातील चाकूने थेट शिवानीच्या गळ्यावर पहिला वार केला. वार होताच शिवानी व तिची मैत्रिण प्राणपणाने ओरडली. त्याचवेळी ठाण्याच्या बाहेर माकडांना हाकलून लावत असलेल्या पोलिसांची नजर पाचशे मीटरवर अंतरावर असणाºया शिवानी व अक्षयकडे गेली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अक्षयचा एक हात पकडला व त्याच्या दुसºया हातातील चाकू ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी घेराव घेऊन अक्षयला ताब्यात घेऊन चाकू ताब्यात घेतला. त्यावेळी शिवानी रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर तळमळत होती. ठाण्यातील वायरलेसचे काम पाहणाºया महिला पोलीस कांचन ठाकूर यांनी तात्काळ शिवानीच्या गळ्यावर रुमाल बांधून रक्त थांबविण्याचे प्रयत्न केले.
सुदैवाने काही अंतरावर आॅटोरिक्षा उभी असल्याचे पोलिसांच्या दृष्टीस पडले. पोलिसांनी त्वरेने धाव घेत आॅटोरिक्षाचालकाला बोलावून शिवानीला घेऊन थेट इर्विन रुग्णालय गाठले. शिवानीचे नातेवाईकसुद्धा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी शिवानीची गंभीर प्रकृती पाहून तात्काळ राजापेठ स्थित गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये तिला हलविले. तेथील अस्थिरोग तज्ज्ञ धनंजय देशमुख, सर्जन बिपीन टोंगळे व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ आशिष डगवार यांनी शिवानीच्या गळ्यावर गंभीर घाव पाहून तिच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया सुरू केली. त्यामुळेच शिवानीला जीवनदान मिळाले. तिच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
हातगाडीवरून खरेदी तीन चाकू
आरोपी अक्षय कडू हा आचारी व्यवसायात असल्यामुळे, त्याने काही दिवसांपूर्वीच राजकमल ते राजापेठ दरम्यान फुटपाथवर लागणाऱ्या एका हातगाडीवरून तीन चाकू ६० रुपयांत खरेदी केले होते. घटनेच्या दिवशी तो एक चाकू घेऊन तो शिवानीवर हल्ला करण्यासाठी आला. तो चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.
या कर्मचाऱ्यांनी दाखविली तत्परता
खोलापुरी गेट ठाण्याच्या इमारतीवर आणि परिसरातील झांडावर माकडे हैदास घालत होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांच्यासह एएसआय दळवी, पोलीस कर्मचारी रवि लोंधे, जयसिंगकर हे ठाण्याबाहेरच उभे होते. शिवानीचा आरडाओरडा पाहून या पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. त्यांनी तत्परतेने शिवानीला उपचारासाठी नेले.
आरोपीने पहिला वार केल्यानंतर आरडाओरडा झाल्याने पोलीस धावून गेले. आरोपीला ताब्यात घेतले. महिला पोलिसाने जखमी मुलीच्या गळ्याला रुमाल बांधला.
- अतुल घारपांडे, पोलीस निरीक्षक, खोलापुरी गेट