यंदा हेक्टरभर बांबू लागवड करा अन् मिळवा सात लाखांचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 11:12 AM2024-07-27T11:12:24+5:302024-07-27T11:17:47+5:30

Amravati : एमआरईजीएसद्वारे पहिल्यांदा एक हजार हेक्टरमध्ये बांबू लागवड

Plant a hectare of bamboo this year and get a subsidy of seven lakhs | यंदा हेक्टरभर बांबू लागवड करा अन् मिळवा सात लाखांचे अनुदान

Plant a hectare of bamboo this year and get a subsidy of seven lakhs

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
जिल्ह्यातील पडीक जमीन लागवडीखाली आणून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात बांबू लागवडीचे अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात मग्रारोहयो द्वारे किमान किमान एक हजार हेक्टरमध्ये बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे.


मग्रारोहयो योजनेंतर्गत जिल्ह्यात बांबू मिशन अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी बांबू लागवडीचे ११,५०० हेक्टरचे उद्दिष्ट असून, त्यासाठी पंचायत समिती कृषी विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एक हेक्टर क्षेत्रावर वैयक्तिक बांबू लागवड व सार्वजनिक बांबू लागवडीकरिता चार वर्षांच्या संगोपनासाठी ७,०४,६४६ रुपये व वैयक्तिक शेत बांधावर बांबू लागवडीकरिता चार वर्षांच्या संगोपनासाठी ८४,२७४ रुपये अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.


जिल्ह्यात ११,५०० हेक्टरमध्ये नियोजन
१४ पंचायत समितींना ८,८०० हेक्टर, कृषी विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाला २७०० असे एकूण ११,५०० हेक्टरमध्ये बांबू लागवडीचे नियोजन आहे. सद्यस्थितीत मग्रारोहयोच्या १२० कामांद्वारे १०१ हेक्टरवर बांबू लागवड करण्यात आलेली आहे.


काय आहे योजना?

  • जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून बांबू लागवड करावयाची आहे. त्यांनी आपले प्रस्ताव ग्राम रोजगार सेवकांमार्फत तयार करुन व ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पंचायत समितीला सादर करायचा आहे.
  • हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याचे संमतीपत्र घेऊन शासनाने निर्धारित २ केलेल्या नर्सरीमधून रोपे खरेदी करावी. या रोपांची लागवड १५ बाय १५ या अंतरात करावी. यानंतर टप्प्याटप्प्याने सात लाखांचे अनुदान मिळेल.


अशी करावी लागवड
एक हेक्टर क्षेत्रात ११११ बांबू रोपांची लागवड करावी. यासाठी चार वर्षांत ६.९० लाखांचे अनुदान देण्यात येते. पहिल्या वर्षी २.७६ लाख, दुसऱ्या वर्षी १.५६ लाख, तिसऱ्या वर्षी १.६२ लाख, चौथ्या वर्षी ७६ हजारांचे अनुदान मिळते.


निकष काय?
बांबू शेतीचे अनुदान मिळण्यासाठी शेतीचा सात-बारा, गाव नमुना (८), अर्जासह गाव नकाशा प्रत, रहिवासी दाखला, बांबू लागवड करणाऱ्या क्षेत्रात ठिबक सिंचनाची सुविधा हवी, बांबूच्या लहान रोपांच्या संरक्षणासाठी शेताला तार कुंपण आदी निकष आहेत.


"शेतकऱ्यांना निरंतरपणे आर्थिक उत्पन्न देणारी ही योजना आहे. अनुदानाची तरतूदही आहे. मग्रारोहयो द्वारे पहिल्यांदा एक हजार हेक्टरमध्ये बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे."
- ज्ञानेश घ्यार, उपजिल्हाधिकारी (महसूल)
 

Web Title: Plant a hectare of bamboo this year and get a subsidy of seven lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.