मंगरुळात पाच दिवसांत १२०० झाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:30+5:302021-08-18T04:17:30+5:30
मंगरुळ दस्तगिर : कोरोना महामारीत अनेकांनी ऑक्सिजनअभावी आपले जीव गमावावा लागला. परिणामी, कोरोनामुळे मानवाला ऑक्सिजनचे मूल्य समजले. नेमका हाच ...
मंगरुळ दस्तगिर :
कोरोना महामारीत अनेकांनी ऑक्सिजनअभावी आपले जीव गमावावा लागला. परिणामी, कोरोनामुळे मानवाला ऑक्सिजनचे मूल्य समजले. नेमका हाच विचार मनात ठेवून तालुक्यातील मंगरूळ दस्तगिर येथे ऑक्सिजन पार्क उभारला जाणार आहे. काढलेली वृक्ष दिंडी ही लोकचळवळ बनली आहे.
तालुक्यातील साडेसात हजार लोकवस्तीच्या मंगरूळ दस्तगीर येथे या भागात अनेक वर्षापासून वृक्षतोड सर्रास, तर वृक्षारोपण व संगोपन नाममात्र होते. येथील सरपंच सतीश हजारे व ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी पुढाकार घेऊन ‘घर तिथे वृक्ष तर रस्ता तेथे वृक्षाच्या रांगा’ असा उपक्रम राबवायला सुरुवात केली. यासाठी येथील भारतीय स्टेट बँक शाखेनेही ट्री-गार्ड तयार करायला आपला ५० हजारांचा निधी दिला आहे. स्वातंत्र्यदिनी जागृतीसाठी पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माय वानखडे, पंचायत समितीच्या उपसभापती माधुरी दुधे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवि भुतडा यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात आली. ही वृक्षदिंडी संपूर्ण गावात फिरविण्यात आली. या दिंडीचे प्रत्येक ग्रामस्थाने पूजन करून आपल्या मुलांच्या नावाने एक झाड लावून त्याची जोपासना करण्याची शपथ घेतली. गावातील ग्रामपंचायत, मुख्य रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, नवीन पोलीस वसाहत, पोलीस ठाणे, विठ्ठल मंदिर, दर्गा येथे संयुक्त उपक्रमातून पाच दिवसात १२०० रोपे लावण्यात आली आहेत. या वृक्ष दिंडीमध्ये पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, वारकरी भजन मंडळ यांनी सहभाग घेतला होता. गावपरिसरातील मोकळ्या असलेल्या जागेवर ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प सरपंच सतीश हजारे यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक पोलीस कर्मचारी पाच रोपांची जोपासना करणार असल्याचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी सांगितले.