वृक्षलागवडीची रोपे करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:51 AM2019-07-24T00:51:17+5:302019-07-24T00:51:52+5:30
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख रोपे लावण्यात आली आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने यातील बहुतांश रोपे करपली. पाऊसच नसल्याने उर्वरित रोपांचे संगोपन तरी कसे करावे, ही मोठी समस्या वनविभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्पासह अन्य शासन, प्रशासकीय यंत्रणेपुढे उभी ठाकली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख रोपे लावण्यात आली आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने यातील बहुतांश रोपे करपली. पाऊसच नसल्याने उर्वरित रोपांचे संगोपन तरी कसे करावे, ही मोठी समस्या वनविभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्पासह अन्य शासन, प्रशासकीय यंत्रणेपुढे उभी ठाकली आहे. काही ठिकाणी रोपांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. ही व्यवस्था वृक्षलागवडीतील उद्दिष्टाच्या तुलनेत तोकडी ठरली आहे.
१ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यात १ कोटी ११ लाख ६८ हजार रोपांचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत शासन-प्रशासनाच्या ५४ यंत्रणांनी सहभाग घेतला आहे. वृक्षलागवडीसाठी रोपे, खड्डे, वृक्षरोपण, छायाचित्र आदी बाबी संबंधित यंत्रणेला आॅनलाइन कराव्या लागल्यात. राज्यात ३० टक्के जमीन वृक्षाच्छादनाने हिरवी करायची आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने चार वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य निश्चित केले. वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि व्याघ्र प्रकल्पाला दिलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट १५ आॅगस्टपर्यत पूर्ण करून तसा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला कळवायचा आहे. मात्र, पावसाने दगा दिला दिल्याने रोपे करपली आहेत. वृक्षलागवड मोहिमेत बहुतांश यंत्रणांनी रोपे नेली. मात्र, पाऊस नसल्याने ही रोपे करपत असून, काही ठिकाणी मरणासन्न अवस्थेला प्राप्त झाली आहेत.
वनमंत्र्यांची बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग
वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अमरावती विभाग आणि जिल्ह्यात वृक्षलागवडीबाबत २४ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार आहे. येथील विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त पीयूष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. यात आतापर्यंतची वृक्षलागवड आणि रोपे करपल्याबाबतची माहिती घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
वृक्षलागवडीतील रोपे जगविताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही रोपे नर्सरीत, तर काही लागवडस्थळी पडून आहेत. या रोपांना जगविण्याचे टार्गेट असले तरी लागवड झालेली रोपे करपत आहेत. पाण्याअभावी ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
- गरेंद्र नरवणे
उपवनसंरक्षक, अमरावती.
अमरावती, चांदूर रेल्वे तालुक्यांना फटका
३३ कोटी वृक्षलागवडीत रोपे करपल्याचा सर्वाधिक फटका अमरावती, चांदूर रेल्वे, भातकुली तालुक्यांना बसला आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के रोपे करपली. पोहरा, वडाळी येथे रोपांना टँकरने पाणी देऊन ती जगविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, हे पर्याय अपुरे पडत आहेत. चिरोडी, अंजनगाव बारी, भातकुली, परलाम, कु ºहा या भागात रोपे जगविण्याचे वनविभागासमोर भीषण संकट आहे.
भाड्याने टँकर मिळेना
पाऊस गायब झाल्यामुळे बळीराजा अतिशय त्रस्त आहे, यात दुमत नाही. परंतु, वनविभागाला रोपे जगविण्यासाठी पाणी देण्याकरिता भाड्याने टँकर मिळत नसल्याचे वास्तव आहे. काही शेतकरी पिके जगविण्यासाठी विहिरीत टँकरने पाणी सोडत आहेत. त्यानंतर विहिरीतून स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी सोडून ते जगविण्याची शक्कल शेतकरी करीत आहेत. त्यामुळे हल्ली भाड्याने टँकर मिळत नसल्याची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.